भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज वयाच्या तिसाव्या वर्षात पदार्पण करतोय. भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर आल्यानंतर विराटच्या फलंदाजीत एक मोठा बदल झालेला आपण सर्वांनी पाहिलेला असेल. यंदाचं वर्ष विराट कोहलीसाठी खासच राहिलेलं आहे. कसोटी, वन-डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारांमध्ये विराटने धावांचा अक्षरशः रतीब घातला.

या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत. सध्या विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आलेली आहे, या सुट्टीचा फायदा घेत विराट कोहली वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी अनुष्कासोबत उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. आजच्या दिवशी विराट कोहलीशी निगडीत असलेल्या 10 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 – भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराटने 52 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या होत्या. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावे जमा होता, सेहवागने 60 चेंडूत शतक झळकावलं होतं. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं 360 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं.

2 – कर्णधार म्हणून पहिल्या 3 डावांत 3 शतकं झळकावणारा खेळाडू

कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतरही विराटची फलंदाजी ही नेहमी बहरलेलीच राहिली आहे. कर्णधार या नात्याने 3 डावांत 3 शतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना विराटने सलग 3 डावांमध्ये 115, 141, 147 अशी शतकी खेळी साकारली होती.

3 – वन-डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाचा खेळाडू

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमधली रंगत सर्वांनाच माहिती आहे. याच पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या नोंदली आहे. ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात विराटने 183 धावांची खेळी केली होती.

4 – विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना शतक झळकावणारा एकमेव भारतीय खेळाडू

विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. विराटनेही 2011 च्या विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व केलं, यादरम्यान विराटने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने या सामन्यात नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

5 – सर व्हिवीअन रिचर्ड्स यांनाही झाला होता कोहलीत आपला भास

क्रिकेटमध्ये दोन दिग्गज खेळाडूंच्या तुलना होणं ही गोष्ट आता काही नवीन नाहीत. सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांची तुलना आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. मात्र वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज सर व्हिवीअन रिचर्ड यांनीही एकदा, विराटच्या खेळीत मला स्वतःचा भास होतो असं वक्तव्य केलं होतं. कोहलीच्या आक्रमक खेळाला रिचर्ड यांनी दिलेली ही सर्वोत्तम पावती होती.

6 – वडिलांचं निधन झाल्यानंतरही विराट खेळत होता रणजी क्रिकेट

1999 सालच्या विश्वचषकावेळी सचिन तेंडुलकर याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं होतं. मात्र या घटनेनंतरही सचिनने विश्वचषक खेळण्याला पसंती दिली होती. विराट कोहलीच्या आयुष्यातही असाच एक प्रसंग घडला होता. 2006 साली दिल्लीकडून रणजी क्रिकेट खेळत असताना कर्नाटकविरुद्ध सामन्यादरम्यान विराटच्या वडिलांचं निधन झालं, मात्र यावेळीही विराटने क्रिकेटला प्राधान्य दिलं. यावेळी विराटने 90 धावा करुन आपल्या वडिलांना अनोखी आदरांजलीही दिली.

7 – चिकू टोपणनाव ते कॅप्टन कोहलीपर्यंतचा प्रवास

दिल्लीच्या स्थानिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीला चिकू या नावाने ओळखलं जायचं. विराटचे प्रशिक्षक अजित चौधरी यांनी कोहलीला हे नाव दिलं होतं. मात्र यानंतर विराटने आपल्या खेळीने सर्वांना थक्क करत भारतीय संघात स्थान मिळवलं, यानंतर आज तो भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारापैकी एक म्हणून गणला जातो.

8 – 2012 च्या ‘Well Dress International Man’ यादीत विराट सर्वोत्तम 10 मध्ये

क्रिकेटसोबत विराट कोहली आपले लुक्स, ड्रेसिंग स्टाईल यासाठीही ओळखला जातो. 2012 साली जाहीर करण्यात आलेल्या ‘Well Dress International Man’ च्या यादीत विराटला सर्वोत्तम 10 जणांमध्ये स्थान मिळालं होतं. अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही या यादीत स्थान मिळालं होतं.

9 – ब्रिटीश मासिक Sports Polo कडून 2015 साली विराटचा बहुमान

क्रिकेट सोबतच विराट अनेक उत्पादनांच्या जाहीरातीही करतो. 2015 साली ब्रिटीश मासिक Sports Polo ने विराटला Most Marketable Player या यादीतमध्ये सहाव्या क्रमांकाचं स्थान दिलं होतं.

10 – करिष्मा कपूर विराटचं पहिलं प्रेम

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विराटने विवाह केला आहे. मात्र एका कार्यक्रमात बोलत असताना विराटने करिष्मा कपूर ही अभिनेत्री आपलं पहिलं प्रेम असल्याचं मान्यं केलं होतं.