#HappyBirthdaySachin : सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आणि भारतीय क्रिकेट यांचं नातं काही औरच .. सचिनने भारताला जगाच्या पटलावर नाव मिळून दिले. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेटला एक नवे स्थान मिळवून दिले. सचिन निवृत्त झाला असला, तरी सचिनला पाहून आजही भारतातील अनेक तरुण क्रिकेटपटू बनण्यासाठी बॅट हातात घेतात. या क्रिकेटच्या देवाचा आज ४६ वा वाढदिवस. २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हे वाचा : #HappyBirthdaySachin : युवीने ‘क्रिकेटच्या देवा’ला व्हिडिओतून दिल्या खास शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टिन गप्टील या खेळाडूंनी द्विशतके झळकावली. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावता येते, हा विश्वास सचिनने क्रिकेटपटूंमध्ये निर्माण करून दिला. त्याच्या याच द्विशतकी खेळीचा एक छोटासा व्हिडीओ ट्विट करत BCCI ने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

२४ फेब्रुवारी २०१० ला सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशक्यप्राय वाटणारी एक गोष्ट शक्य करून दाखवली. सचिनने ग्वालेरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. त्याने केवळ १४७ चेंडूत ही द्विशतकी खेळी साकारली होती. या खेळीत त्याने २५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली होती. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ४०१ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना मात्र २४८ धावांतच गाशा गुंडाळावा लागला होता. हा सामना भारताने १५३ धावांनी जिंकला होता. द्विशतकी खेळी करणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते.