#HappyBirthdaySachin : भारतात क्रिकेट हा धर्म मनाला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज ४६ वा वाढदिवस… २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मानवर अजूनही अधिराज्य गाजवत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेकविध विक्रम आहेत. त्याने २४ वर्षांच्या कारकिर्दीत दमदार कामगिरी केली असून सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो. याच ‘क्रिकेटच्या देवा’ला मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि इतर खेळाडूंनी खास व्हिडिओतून शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज म्हणतो की सचिन हा सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या याच कारकिर्दीच्या जोरावर त्याला आपण ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखतो. आम्ही तुमच्यावर असेच प्रेम करत राहू आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

मुंबईचा नवोदित खेळाडू आदित्य तरे यानेदेखील सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सचिन सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! नव्या दमाच्या तरुणांना क्रिकेटपटू बनण्यासाठी प्रेरित करणाऱ्या तुमचे आभार! आजही प्रत्येक तरुण मुलगा तुमच्याकडे पाहून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. यासाठी सचिन सर तुमचे खूप धन्यवाद, असे आदित्य तरे मुंबई इंडियन्सने तयार केलेल्या व्हिडिओत म्हणाला.

‘क्रिकेटचा मास्टर, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! तुझ्यासोबत अधिकाधिक काम करायला मिळो आणि नवा आठवणी तयार होवोत, हीच सदिच्छा!’ – कायरन पोलार्ड

‘सचिन सर, आपण कायमच सगळ्यांना मदत करत आला आहात. तुम्ही अनेकांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले आहे. तुमच्याकडून प्रत्येक खेळाडूने खूप गोष्टी शिकल्या आहेत. असेच आम्हाला सहकार्य करत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा’  जसप्रीत बुमराह</strong>