गेली दोन वष्रे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणारा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगचे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय मालिकेसाठीसुद्धा भारताने समतोल संघाची निवड केली आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत ३४ वर्षीय हरभजन अप्रतिम कामगिरी बजावत आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय कसोटी संघात त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. एक तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. हरभजनचे पुनरागमन वगळल्यास फारसे आश्चर्यकारक बदल संघात करण्यात आलेले नाही.
अष्टपैलू रवींद्र जडेजाला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, तर गुडघ्याला झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असलेल्या मोहम्मद शमीचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीचा शमीऐवजी समावेश करण्यात आला आहे. कुलकर्णी आतापर्यंत चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून, त्याच्या खात्यावर ८ बळी जमा आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने या दौऱ्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे धोरण स्वीकारले आहे.
‘‘हरभजन सिंगच्या नावाची याआधीच्या बैठकीमध्येसुद्धा चर्चा झाली होती. बांगलादेशची फलंदाजीची फळी खंबीर असून, यात डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे निवड समितीने हरभजनच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबत कर्णधार विराट कोहलीचेसुद्धा मत घेण्यात आले,’’ अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली.
२०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मायदेशातील कसोटी सामन्यात हरभजनने अखेरचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हरभजनच्या खात्यावर १०१ कसोटी सामन्यांत ४१३ बळी जमा असून, तो सर्वात जास्त बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या पंक्तीत तिसऱ्या स्थानावर आहे.

बांगलादेश दौऱ्याचा कार्यक्रम
तारीख    सामना    स्थळ
१० ते १४ जून    एकमेव कसोटी    फतुल्लाह
१८ जून    पहिला एकदिवसीय    मिरपूर
२१ जून    दुसरा एकदिवसीय    मिरपूर
२४ जून    तिसरा एकदिवसीय    मिरपूर

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ
कसोटी : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजन सिंग, करण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन, इशांत शर्मा.
test
एकदिवसीय : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी.one-day
माझ्यासाठी ही नव्याने सुरुवात आहे. या नव्या डावाकडे मी आत्मविश्वासाने पाहात आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी मी सवतोपरी प्रयत्न करीन. मी दरम्यानच्या काळात माझ्या गोलंदाजीवर अतिशय मेहनत घेतली. त्यामुळेच संघात पुनरागमन करता आले.
-हरभजन सिंग