मुंबईचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या IPLमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने यंदाच्या हंगामात ११ सामन्यात २८३ धावा केल्या आहेत. यात दोन दमदार अर्धशतकांचाही समावेश आहे. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटू निवड समितीवर टीका करत असल्याचे दिसून आले आहे.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही BCCI आणि निवड समितीवर सडकून टीका केली आहे. “टीम इंडियामध्ये संधी मिळण्यासाठी सूर्यकुमार यादवने आणखी काय करायला हवं कळत नाही. प्रत्येक IPL आणि रणजी स्पर्धेत त्याची कामगिरी उत्तम आहे. (तरीही त्याला संघात स्थान नाही)… बहुतेक (BCCI आणि निवड समितीने) प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळे नियम बनवलेले दिसतात”, असं मत हरभजनने ट्विट करून व्यक्त केलं.

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमारला त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा देत असताना भारतीय संघात खेळण्यापासून तू काही पावलं दूर असल्याचं सांगितलं होतं. यानंतर सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळणार अशी चर्चाही सुरु झाली होती. परंतु मुंबईकर सूर्यकुमारच्या पदरी निराशाच आली आहे.

सूर्यकुमारची क्रिकेट कारकीर्द

३० वर्षीय सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यांत ४४ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६ च्या सरासरीने २ हजार ४४७ धावा केल्या आहेत तर टी-२० प्रकारात त्याने १६० सामन्यात ३१.३८ च्या सरासरीने ३ हजार २९५ धावा केल्या आहेत. IPLमध्ये ९६ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने २८.६० च्या सरासरीने १ हजार ८३१ धावा केल्या आहेत.