हॅमिल्टन : नुकत्याच आटोपलेल्या भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा शुभमन गिल हा कसोटी पदार्पणासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. असे सांगत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शॉ याच्याऐवजी शुभमनला पाठिंबा दर्शवला आहे.

शुभमनने भारत आणि न्यूझीलंड अ संघांमध्ये झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात ८३ आणि नाबाद २०४ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावले होते. विशेष म्हणजे, विविध क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने छाप पाडली होती. पृथ्वी जवळपास १६ महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

याविषयी हरभजन म्हणाला, ‘‘शुभमनने याआधी राखीव खेळाडू म्हणून भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्याला आधी संधी द्यायला हवी.’’ रोहित शर्माने दुखापतीमुळे घेतलेली माघार आणि निवड समितीने बहरात आलेल्या लोकेश राहुलकडे केलेले दुर्लक्ष यामुळे कसोटी संघात मयांक अगरवाल, पृथ्वी आणि शुभमन यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे या तिघांमध्ये सलामीवीराच्या जागांसाठी चुरस आहे.

‘‘मयांकने कसोटी क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली असून तो अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. आपल्या खेळाची त्याला उत्तम जाण आहे. तीन एकदिवसीय सामने आणि एका सराव सामन्यातील खराब कामगिरीच्या आधारावर त्याला बसवणे चुकीचे आहे. मयांकला मुख्य सलामीवीर म्हणून संधी मिळायलाच हवी,’’ असेही हरभजनने नमूद केले.

पृथ्वीने सलामीला उतरावे- दीप दास

भारताचा माजी यष्टिरक्षक दीप दासगुप्ता याने हरभजनच्या मतांशी असहमती दर्शवली. ‘‘पृथ्वीला अंतिम संघात स्थान मिळायलाच हवे. शुभमन चांगली खेळी करीत आहे, पण पृथ्वीने सर्वात आधी कसोटी पदार्पण केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जायबंदी होण्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीला पहिली पसंती देण्यात आली होती. पृथ्वीला मोठी खेळी साकारता आली नसली तरी तो चांगल्या बहरात आहे,’’ असे दीप दासगुप्ताने सांगितले.