सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तसंच यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर काही सेलिब्रिटींनी चीनवर तोडंसुख घेतले. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे चीनवर राग व्यक्त केला. हरभजन सिंगने मंगळवारी ट्विट केले. “संपूर्ण जगाला करोना व्हायरसने ग्रासले आहे आणि चीनने मात्र साऱ्यांसाठी आणखी अनेक व्हायरस तयार करून ठेवला आहे”, असे हरभजनने ट्विट केले. यासोबतच त्याने राग व्यक्त करणारे इमोजीदेखील शेअर केले.

दरम्यान, “नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल,” असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.