आपल्या फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर मैदान गाजविणारे अनेक खेळाडू असतात. मात्र अनेक खेळाडूंना वैयक्तिक जीवनात खूप काही वेगळे करायचे असते. नेमका हाच मुद्दा हेरून फिरकी गोलंदाज हरभजनसिंग ‘दुसरा’द्वारे सहकारी खेळाडूंची छोटय़ा पडद्यावर विकेट घेणार आहे. क्युयू प्ले ही युटय़ूबवरील दहा भागांची ही मालिका आठ मेपासून चाहत्यांना दिसणार आहे.

हरभजन याने आपल्या या कार्यक्रमाविषयी येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी क्विकहिलचे संस्थापक संजय काटकर व लिओस्ट्राइड एंटरटेनमेंटचे संचालक सुमीत दत्त उपस्थित होते. हरभजन म्हणाला, ड्रेसिंगरूममध्ये खेळाडू खूप दडपणाखाली वावरतात, असा सर्वसामान्य चाहत्यांचा संभ्रम असतो. मात्र ड्रेसिंगरूममध्येच अनेक मजेदार किस्से घडत असतात. मैदानाबाहेरही खेळाडूंचे एक वेगळे विश्व असते. त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी असतात. त्यांनाही काही भावना असतात. अन्य लोकांप्रमाणेच त्यांना कुटुंब असते. हे लक्षात घेऊनच मी या दहा भागांमध्ये खेळाडूंचे मैदानाबाहेरील विश्व कसे असते हे उलगडण्याचा मनोरंजनात्मक तंत्राद्वारे प्रयत्न केला आहे. द्वायने ब्राव्हो, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा, मायकेल हसी, सुरेश रैना, इम्रान ताहीर आदी खेळांडूंबरोबर मी गप्पागोष्टी केल्या आहेत.

मुलाखतीपैकी कोणत्या खेळाडूबरोबरचा संवाद जास्त आवडला, असे विचारले असता हरभजन म्हणाला, ब्राव्हो, जडेजा व रैनाबरोबर संवाद साधताना खूप धमाल आली. ब्राव्हो याने हिंदी भाषेत बोलून मला आश्चर्याचा धक्का दिला. क्रिकेटमध्ये आलो नसतो तर कुणाचे तरी घोडे सांभाळण्याचे काम केले असते हे जडेजाने सांगितल्यानंतर मी देखील काही क्षण भावनाविवश झालो. भारताकडून मी खेळत असताना ब्राव्हो, हसी, ताहीर, वॉटसन हे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू होते. आता चेन्नई सुपरकिंग्ज संघातील माझे सहकारी आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना खूप मजा आली.

मुंबई इंडियन्सऐवजी हरभजन हा यंदा चेन्नईकडून खेळत आहे. त्याबाबत तो म्हणाला, दहा वर्षे मुंबईकडून खेळताना क्रिकेटचा खरा आनंद मिळाला. मला मैदानावर व मैदानाबाहेर बऱ्याच गोष्टी शिकावयास मिळाल्या. त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. चेन्नई संघामध्ये माझे उत्स्फूर्त स्वागत झाले आहे. विशेषत: या संघाच्या चाहत्यांनी माझे खूपच जल्लोषात स्वागत केले आहे.

हरभजनला ‘भज्जी ब्लास्ट’ या कार्यक्रमासाठी क्विकहिल व लिओस्ट्राइड एंटरटेनमेंटचे सहकार्य लाभले आहे.