20 January 2018

News Flash

भज्जीचा वानखेडेवरील प्रेक्षकांशी पंगा!

हरभजन सिंग आणि वादविवाद यांचे अतूट नाते आहे आणि याचाच प्रत्यय भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वानखेडेवरही आला. हरभजनने माकडचेष्टा तसेच अश्लील हावभाव करून वानखेडेच्या

प्रसाद लाड , मुंबई | Updated: November 26, 2012 4:41 AM

हरभजन सिंग आणि वादविवाद यांचे अतूट नाते आहे आणि याचाच प्रत्यय भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वानखेडेवरही आला. हरभजनने माकडचेष्टा तसेच अश्लील हावभाव करून वानखेडेच्या दिव्हेचा पेव्हेलियनमधील प्रेक्षकांना डिवचले. हरभजनच्या या प्रतापांवर वैतागलेल्या प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली आणि याचा फटका दिव्हेचा पेव्हेलियनमधील एका प्रेक्षकाला बसला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपाहारानंतर हरभजन दिव्हेचा पेव्हेलियनच्या इथे क्षेत्ररक्षणाला आला, तेव्हा प्रेक्षकांनी ‘भज्जी विकेट लो’ अशी नारेबाजी सुरू केली. हरभजन काही वेळ शांत राहिला, पण काही वेळानंतर त्याचा संयम सुटला. त्याने प्रेक्षकांना ‘तुम्ही मैदानात या आणि विकेट घेऊन दाखवा’ असे सांगितले. यावर प्रेक्षकांनी कुठलीही टिप्पणी केली नाही. पण दोन विकेट्स मिळवल्यावर हरभजन पुन्हा दिव्हेचा पेव्हेलियन जवळ आला आणि प्रेक्षकांना बूट दाखवायला लागला. ‘तुम्हाला बुटाने मारेन’ असे हरभजनला सांगायचे होते, असे एका प्रेक्षकाने सांगितले. त्यानंतर हरभजनने अश्लील हावभाव केले आणि त्यावर प्रेक्षक चांगलेच खवळले, त्यांनी हरभजनची हुर्यो उडवायला सुरुवात केली. काही वेळातच इंग्लंडचा डाव आटोपला आणि हरभजनने दिव्हेचा पेव्हेलियनजवळ जाऊन प्रेक्षकांना काही अपशब्द वापरले. त्यावर प्रेक्षकांबरोबर त्याची हमरीतुमरीही झाली. हरभजन तिथून निघाला आणि पेव्हेलियन जवळ असलेल्या मुंबई पोलिसांना त्याने या प्रकाराबद्दल सांगितले. तेव्हा संघ व्यवस्थापक एम. सतीश आणि पोलिसांनी दिव्हेचा पेव्हेलियन गाठले. ते जाण्यापूर्वीच दिव्हेचा पॅव्हेलियनमधील पोलिसांनी हरभजनशी हुज्जत घालणाऱ्या एका प्रेक्षकाला ताब्यात घेतले होते. तिथून सतीश वगळता हे सारे जण निघाले आणि वानखेडेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बाजूला असलेल्या पोलिसांच्या चौकीत गेले. तिथे काही पोलिसांनी त्याच्याकडून संबंधित प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
तब्बल १५ महिन्यांनी हरभजन कसोटी सामना खेळायला मैदानात उतरला होता. त्यातच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यामुळे हे सारे दडपण हरभजनवर नक्कीच होते, त्यातच प्रेक्षक आपली फिरकी घेत असल्याचे त्याला वाटले आणि हा सारा प्रकार घडला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
हरभजनने कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही, असे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. पण या प्रकरणाचा फटका ‘त्या’ प्रेक्षकाला बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या प्रेक्षकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि दंड आकारून त्याला ताकीद देण्यात आली. ‘त्या’ प्रेक्षकाच्या मित्राने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, या प्रकरणात आमची काहीही चूक नाही. हरभजनने आमच्याशी माकडचेष्टा केली आणि अश्लील हावभावही केले. आम्ही त्याला कोणतेही प्रत्युत्तर दिले नव्हते. आम्ही इथे सामन्याचा आनंद लुटायला आलो आहोत. हरभजनच्या या माकडचेष्टांचा फुकटचा फटका आम्हाला बसला आहे. हरभजनने त्याच्यावर असलेल्या दबावाचा राग आमच्यावर काढला. वादविवाद हरभजनला नवे नाहीत. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली होती, तर ऑस्ट्रेलियामध्ये मॅथ्यू हेडनशी हुज्जत घातली होती.                     

First Published on November 26, 2012 4:41 am

Web Title: harbhajan singh problem with crowd
  1. No Comments.