२०२० वर्षात जानेवारी महिन्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. याचसोबत आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समितीने भारत अ संघाचीही निवड केली, ज्यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवचाही समावेश करण्यात आला आहे. गेले काही महिने सूर्यकुमार यादवची स्थानिक क्रिकेटमधली कामगिरी चांगली राहिलेली आहे. अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमारने मुंबईला आपल्या आक्रमक खेळीने विजय मिळवून दिलाय. मात्र भारतीय संघाची दारं त्याच्यासाठी अजुनही उघडलेली नाहीयेत.

निवड समितीनेही भारतीय संघात फारसे बदल न करता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जुन्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. फिरकीपटू हरभजन सिंहला निवड समितीच्या याच भूमिकेचं आश्चर्य वाटलं असून त्याने, निवड समितीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

सूर्यकुमारने नेमकं काय चुकीचं केलंय हेच समजत नाही. संघात निवड होण्याचे नेमके निकष आहेत तरी काय?? अशा आशयाचं ट्विट करत हरभजनने निवड समितीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे. सध्या सूर्यकुमार रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करतो आहे.