12 December 2017

News Flash

ऐकावं ते नवलंच…! डिशचं नाव ‘व्हेजिटेबल चिकन रोल’, हरभजनने उडवली खिल्ली

हरभजनने गमतीदार किस्सा आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 20, 2017 5:41 PM

क्रिकेटपटू हरभजनसिंग

देशात सध्या आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. दिवसागणिक क्रिकेट चाहत्यांना एकाहून एक रंगतदार सामन्यांची मेजवानी आयपीएलच्या धर्तीवर पाहायला मिळते. ट्वेन्टी-२० सारख्या मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळाडूंना आपल्या खेळात स्फूर्ती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक संघाचे तसे चोख नियोजन देखील केले जाते. आयपीएल ही लीग सामन्यांची स्पर्धा असल्याने प्रत्येक संघाला अनेक सामने खेळावे लागतात. त्यासाठी देशांतर्गत दौरे सुरू असतात. अशावेळी संघाच्या व्यवस्थापकीय विभागाकडेही खूप मोठी जबाबदारी असते. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या राहण्यापासून ते त्यांच्या जेवणापर्यंतची सुविधा उत्तम कशी देता येईल, ही संघाच्या सपोर्ट टीमसाठी मोठी परीक्षाच असते. त्यात खेळाडू सोशल मीडियावरही सक्रीय असतात. मैदानातील लढाईनंतर वैयक्तिक आयुष्यात घडणारे किस्से किंवा आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. मुंबई इंडियन्स संघाचा शिलेदार हरभजन सिंग यानेही एक गमतीदार किस्सा आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे.

हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी वाढून ठेवण्यात आलेल्या मेजवानीचा हरभजनने ट्विट केलेला फोटो पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल, पण जरा थांबा. हरभजनने हा फोटो वेगळ्याच कारणासाठी ट्विट केला आहे. फोटोत दिसणाऱया डिशचं नाव वाचून तुमच्या तोंडी पाणी सुटण्याऐवजी खळखळून हसत सुटाल. हॉटेलकडून देण्यात आलेल्या या अजब डीशचं नाव होतं.. ‘व्हेजिटेबल चिकन रोल’

डिशचं नाव वाचून जसं तुम्ही खळखळून हसलात तसंच हरभजनचही झालं. हरभजनने या डिशचा फोटो काढून त्वरित सोशल मीडियावर शेअर केला. पण या डिशच्या फोटोसोबत हरभजनने एक तोडगा देखील काढला. ”ज्यांना शाकाहारी खाण्याची इच्छा असेल त्यांनी या डिशमधील चिकन बाजूला काढून खावं, तर ज्यांना चिकन खाण्याची इच्छा आहे त्यांनी डिशमधील भाज्या बाजूला काढून खावं”, अशाप्रकारे हरभजनने या डिशची थट्टा केली. काय मग तुम्हाला काय हवंय? व्हेजिटेबल की चिकन रोल?

First Published on April 20, 2017 5:41 pm

Web Title: harbhajan singh share hilarious dish photo on twitter vegetable chicken roll