भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिल्यानंतर, दोन देशांतील क्रिकेट बोर्डांमध्ये सुरु असलेला वाद अखेर शमला आहे. मात्र भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना हरभजनसिंहने, भारताने गुलाबी चेंडुवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळायला हवा असं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे माजी सदस्य मार्क वॉ यांनीही बीसीसीआयच्या दिवस-रात्र कसोटी सामना न खेळण्याच्या निर्णयाला Selfish म्हटलं होतं.

अवश्य वाचा – टीम इंडिया ‘Selfish’, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉची भारतीय संघावर टीका

“दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआय नकार का देत आहे याचं कारण मला माहिती नाही. कसोटी क्रिकेटसाठी हा एक रंजक पर्याय असून भारतीय संघाने एकदा या प्रकारात कसोटी सामना खेळायलाच हवा, माझा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास पाठींबा आहे. मला सांगा, गुलाबी चेंडूवर सामना खेळण्यास काय समस्या आहे?? तुम्ही ज्यावेळी दिवस-रात्र कसोटी सामना खेळायला सुरुवात कराल त्यावेळी हा प्रकार तुमच्या अंगवळणी पडेल. जितकं दिसतं तितका हा प्रकार कठीण नाही.” Espn Cricinfo या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंह बोलत होता.

अवश्य वाचा – भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नाही, बीसीसीआयचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयमध्ये सुरु असलेल्या वादामध्ये, क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख यांनी दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. मात्र हरभजन सिंहच्या मताप्रमाणे, सध्याच्या भारतीय संघाला दिवस-रात्र कसोटी सामना जिंकण्याचा समसमान संधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे गोलंदाज व फलंदाज हे आता सर्व परिस्थीतींमध्ये चांगला खेळ करु शकतात. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दल बीसीसीआय आगामी काळात काय निर्णय घेतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.