जागतिक स्तरावर तेलाचे दर कोसळले असतानाच पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांत वाढ होते आहे. पेट्रोलच्या किमतीचा भडका उडाल्याने सर्व सामान्यांच्या खिशावर ताण वाढला. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या दराने सरकारविरोधी रोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेटरने देखील सरकारच्या या निर्णयाची फिरकी घेतली आहे. हरभजन सिंगने पेट्रोल दरवाढीला विरोध दर्शवणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बिअर आणि पेट्रोलचे दर समान झाल्याचे सांगत त्याने विनोदी शैलीत पेट्रोल दरवाढीविरोधातील राग व्यक्त केलाय.

हरबजनने ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘झूम ले या घूम ले बियर ८०/-, पेट्रोल ८०/-‘ ट्विटमध्ये बिअर आणि पेट्रोलचा उल्लेख करुन हरभजनने एका अर्थाने सरकारवर निशाणाच साधला आहे. त्याच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हरभजन सिंग बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने २०१५ मध्ये अखेरचा वन-डे सामना खेळला होता. तसेच २०१६ मध्ये तो टी-२० सामन्यात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर तो संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. हरभजनने १०३ कसोटी सामने खेळले असून, ३२.४६ च्या सरासरीनं त्याने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. यात ८४ धावा देत ८ बळी मिळवण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याने केली आहे. याशिवाय त्याने २५ वेळा ५ बळी मिळवले आहेत तर पाच वेळा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.  वन-डेत हरभजनने २३६ सामन्यांत ३३.३५ च्या सरासरीनं २६९ बळी मिळवले आहेत. ३१ धावांत ५ बळी ही त्याची वन-डेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. वन-डे सामन्यात हरभजनने तीनवेळा निम्म्या संघाला तंबूत पाठवण्याची किमया केली आहे. टी-२० सामन्यात त्याच्या नावावर २८ सामन्यांत २५ विकेट्स आहेत. आयपीएल स्पर्धेत हरभजन मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसला आहे.