पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताककडून सहानुभूती
कलेच्या एकाच प्रांतातील व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे दु:ख समजणे स्वाभाविक मानले जाते. ‘दुसरा’चा जनक मानला जाणारा पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगविषयी सहानुभूती प्रकट केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये हरभजनला योग्य वागणूक मिळत नाही, असे ताशेरे मुश्ताकने ओढले आहेत.
रविचंद्रन अश्विन हा जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज आहे. मात्र मागील सामन्यांत हरभजनला एकदाही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकेल, असा इशारा मुश्ताकने दिला आहे.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापक हरभजनला जी वागणूक देत आहे, ती फारशी चांगली नाही. तो आताही जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. अश्विनचा उदय होणे याचा अर्थ असा नव्हे की, हरभजनला वगळणे किंवा त्याला दडपणाखाली वागणूक देणे,’’ असे मुश्ताक या वेळी म्हणाला.
३९ वर्षीय मुश्ताकने कसोटीत २०८ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८८ बळी मिळवले आहेत. अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूला गरजेनुसार वगळणे, हा चांगला पायंडा नाही, असे मुश्ताकने सांगितले. तो म्हणाला, ‘‘२०११ला हरभजनला वगळण्यात आले, तेव्हापासून तीनदा त्याने संघात पुनरागमन केले. संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा त्याला बोलावले आणि जेव्हा गरज संपली तेव्हा त्याला दूर ठेवले, हाच त्याचा अर्थ आहे. हरभजनच्या गाठीशी असलेल्या अनुभवाकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर अनावश्यक दडपण निर्माण केले आहे.’’