News Flash

रात्र वैऱ्याची आहे!

दोन कसलेले पहेलवान जसे सुरुवातीलाच पटात घुसण्याचा प्रयत्न करत नाहीत तर उलट काही काळ खडा-खडी करण्यात घालवतात,

| November 15, 2013 03:37 am

दोन कसलेले पहेलवान जसे सुरुवातीलाच पटात घुसण्याचा प्रयत्न करत नाहीत तर उलट काही काळ  खडा-खडी करण्यात घालवतात, तसेच काहीसे विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांचे चालले आहे. पण दोघेही इतके तुल्यबळ आहेत की त्यांना वरचष्मा मिळूनही प्रतिस्पध्र्याला चीत करणे आतापर्यंत जमलेले नाही.
चौथा डाव संपला आणि त्यानंतर आनंद काहीसा विचलित झाल्यासारखा वाटला. मॅग्नसने धूर्तपणे आनंदचे मनोबल खच्ची करण्याचे डावपेच सुरू केले आहेत. मला आठवते की न्यूयॉर्कमधील जगज्जेतेपदाच्या लढतीत गॅरी कास्पारोव्हने काहीसे असेच केले होते. गॅरी सतत पटावरून उठून जायचा आणि बाहेर जाताना त्या खोलीचे दार जोराने आपटत असे. तसेच आनंदने खेळी दिल्यानंतरच कास्पारोव्ह परत यायचा आणि उभ्या-उभ्या खेळी देऊन पुन्हा अंतर्धान पावायचा. थोडक्यात तुला हरवायला मला विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत असेच तो दर्शवत असे. आनंदने नववा डाव जिंकून आघाडी घेतल्यावर गॅरीने आनंदची हिम्मत खचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू केले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आनंद सभ्य असल्यामुळे या प्रकाराला बळी पडला होता आणि गॅरीने सामना खिशात घातला होता.  
मॅग्नसने मात्र आनंदच्या मनोबलावर इतका उघड उघड हल्ला चढवलेला नाही, पण त्याने विश्वविजेत्याच्या दबदब्याला आपण जुमानत नाहीच तर आपण त्याला साध्या खेळाडूइतकेच मानतो, असे दाखवण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या डावाचेच उदाहरण आपण घेऊ. एखादा नवखा खेळाडू पण जगज्जेत्याबरोबर हरणार नाही, अशा स्थितीमध्ये आनंदने बरोबरीचा प्रस्ताव मांडल्यावर मॅग्नसने उद्दामपणे तो झिडकारून लावला होता आणि जगज्जेत्याचा एक प्रकारे जाहीर अपमान केला होता.
अशा सूक्ष्म गोष्टींमधून मनोबल खच्ची होण्यास मदत होते हे सांगण्यासाठी काही फार मोठा मानस शास्त्रज्ञ हवा, असे काही नाही. परंतु अनेक शांत स्वभावाची माणसे अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगामुळे विचलित होतात. जगज्जेतेपद आणि १७ कोटींच्या बक्षिसासाठी खेळणाऱ्या मॅग्नसने आनंदचे मानसिक विश्लेषण केलेले असणारच. फक्त आनंदचे सहकारी त्याला कसे यातून बाहेर काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आनंदला एकच सूचना द्यावीशी वाटते की रात्र वैऱ्याची आहे. जागा राहा.
माझ्या दृष्टीने पुढचे दोन डाव महत्त्वाचे आहेत. कारण दोघांच्याही मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी आता लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 3:37 am

Web Title: hard night for viswanathan anand
टॅग : Viswanathan Anand
Next Stories
1 दिल्लीसमोर मुंबईची घसरगुंडी
2 सायनाला पराभवाचा धक्का
3 वानखेडे बेभान-वेडे!
Just Now!
X