क्रिकेट कारकिर्दीत गेली २३ वर्षे मैदाने गाजविणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता युवा खेळाडूंना यशासाठी सल्ला दिला आहे. इतरांकडून आदर मिळवण्यासाठी मेहनत आणि बांधीलकी ही गुरुकिल्ली असते, असे सचिन सांगतो.
‘‘स्पर्धेला तुम्ही धर्याने तोंड द्यायला हवे. बांधीलकी, प्रयत्न आणि योगदान याचाच तुम्ही विचार करायला हवा. इतरांनी काय केले, म्हणून तू चिंता करीत बसू नकोस, हेच मी माझ्या मुलाला सांगतो. जेव्हा तू योग्य करतोस, तेव्हा संघ तुझाच कित्ता गिरवतो. स्पर्धा ही नेहमीच तिथे असते,’’ असे सचिनने सांगितले.
‘‘जेव्हा तुम्ही मेहनत करता, तेव्हा नशीबसुद्धा तुमच्या मार्गावर असते. आव्हाने ही आयुष्यात पावलोपावली असतात; परंतु तुम्ही अपार मेहनत केली तर या आव्हानांवर सहजगत्या मात करू शकता. त्यामुळे नशिबावर फार अवलंबून राहू नका, फक्त मेहनत घ्या. कामगिरी ही सातत्याने उंचावणारी कधीच राहत नाही; परंतु खंबीर मनाची माणसे या काळातही तगून राहतात,’’ असे सचिनने सांगितले.
सांघिकतेविषयी सचिन म्हणाला की, ‘‘तुम्ही एकत्रित असता, तेव्हा कोणत्याही अडथळ्यांचा मुकाबला करू शकता. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेकडे आम्ही फक्त आणखी एक स्पर्धा अशाच पद्धतीने पाहिले. आमची सांघिकता कौतुकास्पद होती.’’
आयुष्यातील आव्हानांविषयी सचिन म्हणाला की, ‘‘शालेय दिवसांमध्ये क्रिकेट आणि अभ्यासाचा समतोल साधणे, हे माझ्यापुढील फार मोठे आव्हान होते; परंतु माझे पालक आणि माझ्या शाळेने मला अतिशय सहकार्य केले.’’
‘‘मुलांसोबत वेळ घालवायला मला अतिशय आवडते. मी त्यांच्यासोबत जेव्हा वेळ घालवतो, तेव्हा ते माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण असतात. हे क्षण तुम्ही कुठेही खरेदी करू शकत नाहीत. मी अजूनही तरुण आहे, यावर विश्वास ठेवायला मला आवडते,’’ असे सचिनने सांगितले.