अस्ताना, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत हरदीपने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीयांचे वर्चस्व नसणाऱ्या ग्रीको रोमन प्रकारात ९८ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत हरदीपने रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली. अथेन्स येथे २०१४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मौसम खत्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ऑलम्पिकसाठी हेवीवेट गटात ग्रीको रोमन प्रकारात खेळणारा हरदीप पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे प्रत्येक वजनी गटातील अव्वल दोघांना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी होती.
हरदीपने मातब्बर प्रतिस्पध्र्याना चीतपट करत अंतिम फेरी गाठली. हरदीपने तुर्कमेनिस्तानच्या अर्सलान सापारमॅमदेव्हचा ११-० असा धुव्वा उडवला. उपान्त्य फेरीत त्याने कझाकिस्तानच्या माग्र्युलन असेमबेकोव्हवर ११-२ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत हरदीपसमोर चीनच्या डी क्षिओचे आव्हान असणार आहे.
स्पर्धेतील अन्य कुस्तीपटू विनेश फोगट (महिला ४८ किलो), अनिता (महिला ६३ किलो), सोमवीर (पुरुष ८६ किलो फ्रीस्टाइल), हितेंदर (पुरुष १२५ फ्रीस्टाइल) आणि रवींदर (ग्रीको रोमन ६६ किलो) या कुस्तीपटूंना रिओवारी पक्की करता आली नाही. योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव हे कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.