बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तासभर कसून सराव

बेंगळूरु : भारताचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ाने पाठीच्या दुखापतीतून सावरण्याचे संकेत देताना बुधवारी बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) कसून सराव केला.

२६ वर्षीय हार्दिकने सराव सत्रात त्याने सरळ बॅटने चेंडू खेळले. त्याशिवाय गोलंदाजीचाही थोडा वेळ सराव केला. हार्दिकने पाठीच्या दुखापतीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून भारतीय संघातील स्थान गमावले आहे. हार्दिकचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी विचार करण्यात येणार होता. परंतु पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला वगळण्यात आले. २०१८च्या आशिया चषकातसुद्धा त्याला याच दुखापतीने ग्रासले होते.

हार्दिकच्या तंदुरुस्तीवर पुढील काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते. अन्यथा त्याला पुनरागमनासाठी ‘आयपीएल’चीच वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

इशांतची शनिवारी तंदुरुस्ती चाचणी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. ‘एनसीए’मधील वैद्यकीय चमूच्या मार्गदर्शनाखाली ३१ वर्षीय इशांतच्या दुखापतीवर उपचार सुरू असून या चाचणीचा अडथळा यशस्वीपणे ओलांडल्यानंतरच इशांत न्यूझीलंडला रवाना होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने सांगितले. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यात तीन दिवसीय सराव सामना रंगणार आहे.