17 October 2019

News Flash

हार्दिक पांड्या, लोकेश राहुल निलंबित; वन-डे मालिकेतून बाहेर

महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल होणार चौकशी; चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई

‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. BCCI च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेला मुकावे लागणार आहे.

‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण पटलेले नसून या दोन्ही खेळाडूंवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव विनोद राय यांनी मांडला होता. पण याबाबतचा निर्णय BCCI च्या प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्या डायना एडलजी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

यावर ज्यावेळी एडलजी यांचे मत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सडेतोड मत मांडले. ‘या दोघांनी जे वक्त्यव्य केले आहे, त्यासाठी त्यांची चौकशी व्हायला हवी. तसेच त्यांची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोवर त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे. BCCI चे CEO राहुल जोहरी यांच्यावर ज्यावेळी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते, तेव्हा त्यांच्यावरील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्याच प्रकारची कारवाई या दोघांच्या बाबतीतही व्हायला हवी’, असे त्यांनी सुचवले होते.

त्यानंतर BCCI च्या प्रशासकीय समितीने (CoA) हा निर्णय घेतला. दरम्यान, शनिवारपासून (१२ जानेवारी) सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांचा संघात समावेश करण्यात आला होता. पण आता या निर्णयानंतर त्यांना या मालिकेला मुकावे लागणार आहे.

First Published on January 11, 2019 5:24 pm

Web Title: hardik pandya and kl rahul suspended pending enquiry ruled out of odi series vs australia