‘बीसीसीआय’ सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभेची मागणी

नवी दिल्ली : टीव्ही कार्यक्रमात अश्लील वक्तव्य करणारे निलंबित क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी सोमवारी बिनशर्त माफी मागितली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना माफ करावे आणि त्यांची कारकीर्द संपवू नये, असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी व्यक्त केले आहे.

पंडय़ा-राहुल या दोघांनीही दिलगिरी प्रकट केली असली तरी ‘बीसीसीआय’शी संलग्न १० राज्य संघटनांनी चौकशीसाठी लोकपालाच्या नियुक्तीकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र ही चौकशी प्रशासकीय समिती आणि ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांमार्फत व्हावी, अशी मागणी प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी यांनी केली आहे.

‘‘नव्याने बजावण्यात आलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीला हार्दिक आणि राहुल यांनी जवाब दिला आहे. यात त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. प्रशासकीय समितीच्या प्रमुखांनी ‘बीसीसीआय’च्या नव्या घटनेमधील कलम ४१ (क) अनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली आहे.

‘कॉफी वुईथ करण’ कार्यक्रमात पंडय़ा आणि राहुल यांनी प्रकट केलेली मते वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अनेक महिलांशी संबंध आणि पालकांशी याबाबत मोकळेपणाने चर्चा होते, या त्यांच्या मतांवर तीव्रतेने पडसाद उमटवले. या पाश्र्वभूमीवर त्यांना माफ केल्यास पाठीशी घातल्यासारखे होईल, अशी भीती एडल्जी यांनी व्यक्त केली होती. याचप्रमाणे भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही या दोघांच्या वक्तव्याबाबत नाराजी प्रकट केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून अर्ध्यावरून परत मायदेशी धाडण्यात आलेल्या पंडय़ा-राहुल यांचे विश्वचषक क्रिकेटमधील भवितव्य अधांतरी आहे. युवा खेळाडूंची कारकीर्द ‘बीसीसीआय’ने संपुष्टात आणू नये, असे राय यांनी एडल्जी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.