तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न व्यर्थच ठरले.

हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करत भारतीय संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. या भागीदारीदरम्यान एक अनोखा विक्रमही घडला. हार्दिक आणि शिखर दोघेही आतापर्यंत एकत्र ३८ वन-डे सामने खेळले आहेत. परंतू दोघांनीही एकत्र फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. ४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली.

शिखर आणि हार्दिरक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.