निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची स्तुतिसुमने

जर अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जास्त काळ खेळपट्टीवर राहिला तर हा भावी कपिल देव होऊ शकतो, अशी स्तुतिसुमने निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी उधळली आहेत.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकने दमदार कामगिरी केली आहे. भारताकडून खेळताना एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही त्याने चमक दाखवली आहे. त्याचबरोबर कसोटी सामन्यांमध्येही त्याची कामगिरी उजवी ठरत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावत पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

‘‘जर हार्दिक जास्त काळ खेळपट्टीवर राहिला तर येत्या काही काळात त्याची तुलना महान अष्टपैलू कपिल देव यांच्याशी होऊ शकते,’’ असे प्रसाद यांनी सांगितले.

कपिल यांनी १९९४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. पण त्यानंतर भारताला तडफदार फलंदाजी आणि वेगवान मारा करणारा अष्टपैलू खेळाडू मिळाला नाही. इरफान पठाण हा चांगली स्विंग गोलंदाजी करून धडाकेबाज फलंदाजीही करत होता. पण दुखापतींमुळे त्याला काही काळ संघाबाहेर राहावे लागले आणि त्यानंतर चांगला फॉर्म नसल्यामुळे त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीसारखाही अष्टपैलू भारतीय संघात होता. पण त्याला जास्त काळ खेळता आले नाही.

सध्याच्या घडीला अष्टपैलू खेळाडू शोधण्याची मोहीम संपली आहे का, असे विचारल्यावर प्रसाद म्हणाले, ‘‘हो, मला हे सांगताना आनंद होत आहे की, आमची अष्टपैलू खेळाडू शोधण्याची मोहीम यशस्वी ठरली आहे. हार्दिक हे त्याचेच फलित आहे.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘यापूर्वी हार्दिक एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर झाला आहे. त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आणि आता या क्रिकेट प्रकारातही त्याच्याकडून चमकदार कामगिरी होत असून तो स्थिरस्थावर होत आहे.’’

  • एका षटकात २४ धावा फटकावण्याचा भारतीय फलंदाजांचा विक्रमही या वेळी पंडय़ाने आपल्या नावावर केला. यापूर्वी भारताच्या संदीप पाटील आणि कपिल देव यांनीही असा पराक्रम केला होता.
  • पंडय़ाने या सामन्यात भारताबाहेरील देशांमध्ये सर्वात जलद दुसरे शतक झळकावले. यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध ७८ चेंडूंत शतक झळकावले होते.