डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे अडचणीत आलेल्या हार्दिक पंड्याने ट्विट करण्यात आलेलं अकाऊंट आपलं नसल्याचं सांगितलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हार्दिक पंड्याने यासंबंधी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पंड्याने पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळले आहेत.

‘मी अशा प्रकारचं कोणतंही ट्विट किंवा वक्तव्य ट्विटर किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी केलेलं नाही. माझं नाव आणि फोटो वापरत बोगस अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. मी संपर्क साधण्यासाठी फक्त माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा वापर करतो. आणि ज्या ट्विटवरुन गदारोळ सुरु आहे ते मी असल्याचं भासवत बोगस अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे’, असं हार्दिक पंड्याने स्पष्ट केलं आहे.

‘माझ्या मनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आहे. मी त्यांचा अनादर होईल असं काहीच करण्याचा विचारही करु शकत नाही’, असंही हार्दिक पंड्याने म्हटलं आहे. आपण न्यायालयात यासंबंधी पुरावे सादर करु अशी माहिती पंड्याने दिली आहे.

@hardikpandya7 हे हार्दिक पांड्याचं अधिकृत ट्विटर हॅंडल आहे, पण ज्या ट्विटवरून पांड्या अडचणीत आला ते ट्विट @sirhardik3777 या पॅरोडी अकाउंटवरून करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कोर्टात तक्रार देखील @sirhardik3777 याच अकाउंटविरोधात करण्यात आल्याची माहिती आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.