‘कॉफी विथ करण’ या टीव्हीवरील टॉक शो मध्ये महिलांबाबत आक्षापार्ह विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयने चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची सध्या घरकोंबड्यासारखी अवस्था झाली आहे. कारण, निलंबन झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्याने तो नुकताच भारतात परतला. मात्र, आपल्या घरी आल्यानंतर तो अद्याप घरातच असून कुठेही बाहेर गेलेला नाही. इतकेच नव्हे तर तो कोणाचे फोन कॉल्सही घेत नाहीए. अॅडलेडमध्ये झालेला दुसऱा एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांचा पाठलाग करुन मिळवलेल्या मोठा विजयही त्याने घरात टीव्हीवरच बसूनच पाहिला.

हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल या दोघांनी ‘कॉफी विथ करण’मध्ये लैंगिकता आणि महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. हा भाग ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे या दोघांना मोठ्या टीकेला समोरे जावे लागले होते. यानंतर या दोघांना आपल्या चाहत्यांची आणि सहकाऱ्यांची जाहीर माफी मागावी लागली होती. दरम्यान, या दोघांनी मागितलेल्या माफीनाम्यावर प्रशासकीय समिती समाधानी नव्हती. या दोघांवर कठोर कारवाई व्हावी अशी सूचना त्यांनी बीसीसीआयला केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्या दोघांवर निलंबनाची कारवाई करीत त्यांना ऑस्ट्रेलियातून भारतात जाण्यास भाग पाडले.

पांड्या गुजरातचा रहिवासी आहे. आपल्या शहरात मकर संक्रांतीचा मोठा उत्साह असताना तसेच बाहेर सर्वजण पंतग उडवण्याचा आनंद घेत असतानाही तो घराबाहेर पडला नाही. त्याला पतंग उडवायला आवडते मात्र, गेल्या काही वर्षात त्याच्या सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मकरसंक्रांतीच्या काळात त्याला घरी उपस्थित राहता आले नव्हते. यंदा तो घरी आहे मात्र त्याच्यावर होत असलेल्या टीकेमुळे तो सध्या खूपच नाराज असून तो घराबाहेर पडलेला नाही. घरी देखील सर्वजण या मुद्द्यावर बोलणे टाळत आहेत. त्याचा मोठा भाऊ देखील त्याच्याशी या विषयावर बोलत नाही. आम्ही आता केवळ बीसीसीआय केव्हा पंड्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेते या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे त्यांच्या वडिलांनी मिड डे शी बोलताना सांगितले.

या वादामुळे पांड्याला चांगलाच मानसिक आणि व्यावसायिक झटका बसला आहे. त्याने जिलेटसोबतचा आणि खार जिमखान्यासोबतचा व्यावसायिक करार गमावला आहे.