नवी मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातील स्थान गमावलेल्या हार्दिक पंडय़ाने शुक्रवारी झोकात पुनरागमन केले. नवी मुंबई येथे सुरू असलेल्या डी. वाय. पाटील चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करतानाच अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे रिलायन्स-१ संघाने बँक ऑफ बडोदाचा २५ धावांनी पराभव केला.

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि मुंबई इंडियन्स संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकांच्या उपस्थितीत हार्दिकने तंदुरुस्ती आणि अष्टपैलूत्वाचा उत्तम नजराणा पेश केला. त्याशिवाय डावखुरा शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनीही दुखापतीतून सावरण्याचे संकेत दिले.

प्रथम फलंदाजी करताना हार्दिकच्या २५ चेंडूंतील ३८ धावांमुळे रिलायन्स १ संघाने २० षटकांत ८ बाद १५० धावा केल्या. हार्दिकने एक चौकार आणि चार उत्तुंग षटकार लगावले.

प्रत्युत्तरात फिरकीपटू राहुल चहरने अवघ्या १८ धावांत ५ बळी मिळवून बँक ऑफ बडोदाचा डाव १२५ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. हार्दिकने २६ धावांत तीन बळी मिळवून गोलंदाजीतही चमक दाखवली.

अन्य सामन्यात भारतीय नौदल संघाने सीएजीवर ५० धावांनी विजय मिळवला. लखन सिंगने साकारलेल्या (१०४ धावा) शतकामुळे भारतीय नौदलाने ६ बाद २०३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात सीएजी संघाला १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली.