भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यावर कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय कसोटी क्रिकेटच्या भविष्यातील एक खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो, असा विश्वास कुंबळेंनी व्यक्त केला. भारतीय संघ गुरूवारपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याआधी कुंबळे म्हणाले की, संघाचे संतुलन राखण्यासाठी पंड्याचा संघात समावेश करणे गरजेचे आहे. संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याने पार पाडावी यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. सतत १४० प्रतिकिमीच्या वेगाने गोलंदाजी करणे आणि मधल्या पट्टीत चांगली फलंदाजी देखील करणे, असा खेळाडू संघासाठी मिळणे दुर्मिळ असते. एका उत्तम अष्टपैलू खेळाडूची क्षमता त्याच्यात आहे.

 

२३ वर्षीय पंड्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. पण मागील काही वन डे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पंड्याने चांगली कामगिरी करत आपली योग्यता सिद्ध करून दाखवली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीमध्ये पंड्याला भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय संघाच्या सलामीजोडीच्या निराशाजनक कामगिरीबद्दल बोलताना कुंबळे म्हणाले की, सलामी जोडीला घेऊन सध्या तरी आम्हाला कोणतीही चिंता नाही. मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी याआधीच्या कसोटी मालिकांमध्ये चांगली सुरूवात करून दिली होती. पण परिस्थितीमध्ये संघाच्या सलामीजोडीसाठी पर्याय उपलब्ध असावा या दृष्टीकोनातून अभिनव मुकुंद देखील आमच्याकडे उपलब्ध आहे, असेही कुंबळे म्हणाले.