टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्याच्या ‘कॉफी विथ करण’मधील महिलांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यात आता वेगवान गोलंदाज श्रीसंतची भर पडली आहे. सोमवारी गोवा येथे पत्रकार परिषदेत श्रीसंतने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, केएल-पांड्या यांनी बोलताना खबरदारी बाळगायला हवी होती. जे काही घडलंय ते खरोखरच वाईट आहे. महिलांचा आदर करायलाच हवा. त्यांना आपली चूक नक्की उमगली असेल. ते तरुण आहेत. चौकशीअंती ते पुनरागमन करू शकतील. मोठी चूक केलेले पुन्हा क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे पांड्या आणि राहुल यांना पुन्हा एकदा संधी मिळायला हवी. दोघेही गुणवान क्रिकेटपटू आहेत.

पुढे बोलताना श्रीसंतने पुनरागन करण्याची आशा असल्याचे सांगितले. माझ्यात अजूनही १४३ किलोमीटर प्रती ताशी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. टी-२० क्रिकेटमध्ये चाळिशी गाठलेले खेळाडू खेळले आहेत. मी ३६ वर्षांचा आहे, शरीर साथ देत आहे, त्यामुळेच पुनरागमनाचा विश्‍वास वाटतो असे तो म्हणाला. २०१३ आयपीएल क्रिकेट स्पर्धेत स्पॉटफिक्‍सिंग प्रकरणी श्रीशांतला अटक करण्यात आली होती,त्यानंतर “बीसीसीआय’ने त्याच्यावर बंदी लादली होती. श्रीसंतने अखेरचा सामना ऑगस्ट २०११ मध्ये खेळला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस श्रीसंतवरील बंदी उठण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, टीव्ही कार्यक्रमात अश्लील वक्तव्य करणारे निलंबित क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी सोमवारी बिनशर्त माफी मागितली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना माफ करावे आणि त्यांची कारकीर्द संपवू नये, असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी व्यक्त केले आहे.