भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले काही महिने आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावला आहे. २०१९ साली घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेला टी-२० सामना हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. यानंतर हार्दिकच्या पाठीच्या दुखण्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र आता तो या दुखापतीमधून सावरला असून, भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यात तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळेल. यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेत पांड्या संघात पुनरागमन करेल असं वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलं आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबईच्या शिवम दुबेने भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेतही हार्दिकची निवड झालेली नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही शिवम दुबेला स्वतःची संघातली निवड सार्थ ठरवून दाखवण्याची संधी असणार आहे.