टी-२० मालिकेत हार्दिक पांड्याने आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत भारतीय संघाच्या मालिकाविजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिकने श्रेयस अय्यरच्या साथीने फटकेबाजी करत १९५ धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. त्याच्या या खेळीसाठी मालिकावीरीचा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला. परंतू भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते हार्दिकला त्याच्यासोबत आणखी एका फिनीशरची गरज आहे.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळायला हवं – शेन वॉर्न

“डेथ ओव्हर्समध्ये पांड्याला एका बाजूने भक्कम आधार देईल अशा एका खेळाडूची भारताला आजही गरज आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधला भारताचा सुवर्णकाळ आठवून पाहा…धोनीसोबत युवराज सिंह असायचा. धोनीइतका चांगला फिनीशर कोणीच नाही….पण त्यालाही दुसऱ्या बाजूने कोणाचीतरी गरज लागायची. तुम्ही एकट्याच्या जीवावर सामना संपवू शकत नाहीत. हार्दिक पांड्यासोबत भारताला आणखी एका फिनीशरची गरज आहे.” आकाश चोप्रा Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

दरम्यान, वन-डे आणि टी-२० मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेतली हार्दिकची कामगिरी पाहून त्याला कसोटी संघातही स्थान देण्याची मागणी होते आहे. परंतू भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक गोलंदाजी करायला लागल्याशिवाय त्याचा कसोटी संघासाठी विचार करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय.