भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पंडय़ाची भारतीय संघात निवड झाली होती, परंतु सामन्यांच्या ताणातून त्याला विश्रांती मिळावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या तरी पंडय़ाला विश्रांती का देण्यात आली, ही चर्चा ऐरणीवर आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या संघात पंडय़ाऐवजी अन्य बदली खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. मात्र पंडय़ाला विश्रांती प्रदीर्घ सामन्यांमुळे देण्यात आली की, दुखापतीमुळे हे बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही.

थिरुवनंतपूरम येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात स्वत:च्या गोलंदाजीवर फलंदाजाने जोराने फटकावलेला चेंडू अडवताना पंडय़ाचा हात दुखावला होता. मात्र तरीही त्याने ते शेवटचे षटक पूर्ण केले होते.

पंडय़ाचा पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघात समावेश होता. मात्र राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पंडय़ाला विश्रांती दिली आहे. पंडय़ाला बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात येणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

जूनपासून हार्दिक ३० सामन्यांत खेळला

जूनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेपासून हार्दिक पंडय़ाने तीन कसोटी, २२ एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० अशा एकूण ३० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कर्णधार विराट कोहलीनंतर तो या कालावधीत सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे. मात्र भारताचा कसोटी संघ निवडण्यापूर्वीच पंडय़ाला विश्रांतीचा निर्णय का घेण्यात आला नाही, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही. याबाबत राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.