मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंगला ३७ धावांनी हरवले. मुंबईच्या विजयात हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा होता. मुंबईचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्याने शेवटच्या ८ चेंडूत २५ धावा केल्या. त्याच्या या ताबडतोड फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्स १७० धावांपर्यंत मजल मारु शकले.

या धमाकेदार खेळी दरम्यान त्याने अनेक प्रकारचे फटके मारले परंतु प्रेक्षकांचे खरे लक्ष वेधून घेतले ते त्याच्या हॅलिकॉप्टर शॉटने. चेन्नई सुपरकिंगचा कर्णधार मिस्टर कूल महेंद्र सिंह धोनी या हॅलिकॉप्टर शॉटसाठी ओळखला जातो. मात्र याच धोनीसमोर हार्दिकने हॅलिकॉप्टर शॉटचे प्रदर्शन केले. १९ व्या षटकात ड्वेन ब्राव्होच्या चौथ्या चेंडूवर त्याने अफलातून हॅलिकॉप्टर शॉट लगावला.

हार्दिक पांड्या धोनीला आपल्या फलंदाजीचा प्रेरणास्त्रोत मानतो. त्यामुळे हॅलिकॉप्टर शॉट मारल्याबद्दल धोनीने त्याचे कौतूक करावे अशी त्याची अपेक्षा होती. मात्र शॉट मारल्यानंतर धोनीने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. अशी खंत त्याने पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान अनेकांनी हार्दिकचे या उत्कृष्ट शॉटसाठी अभिनंदन केले.