तिसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात करत भारताने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्यानेही तिसऱ्या सामन्यात आश्वासक कामगिरी केली. फलंदाजीत हार्दिकला आपली कमाल दाखवता आली नसली तरीही त्याने गोलंदाजीत दोन महत्वाच्या विकेट आणि एक उत्कृष्ट झेल पकडून आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याच्या या कामगिरीवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे भलतेच खूश झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ परिपूर्ण झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

अवश्य वाचा – IND vs NZ : Flying Pandya ! हार्दिकचा हा थरारक झेल पाहिलात का??

“हार्दिकने खूप चांगला आणि आश्वासक खेळ केला. कालच्या सामन्यात त्याची कामगिरी पाहिल्यानंतर तो संघात असणं का गरजेचं आहे हे अनेकांना स्पष्ट झालं असेल. तो संघात नसताना जी एक पोकळी निर्माण झाली होती ती आता भरुन निघाली आहे, भारताचा संघ आता परिपूर्ण झाल्यासारखा वाटतो.” STAR SPORTS वाहिनीवर बोलत असताना गावसकर यांनी पांड्याच्या खेळाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – Video : जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर भडकतो…

तिसऱ्या सामन्यात तो खूप चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकत होता. याचसोबत बाऊंसर चेंडूंचाही त्याने खूप चांगला वापर केला. याचसोबत तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. झेल घेताना त्याची मैदानातली कसरत, अचूक फेकीमुळे होणारे धावबाद आणि मधल्या फळीत मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्याची ताकद यामुळे हार्दिक पांड्याचं संघात असणं अत्यंत गरजेचं आहे, गावसकर बोलत होते. कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हार्दिकवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अवश्य वाचा – IND vs NZ : ‘हिटमॅन’ची भारताचा सिक्सर किंग बनण्याकडे वाटचाल, धोनीशी बरोबरी