भारतीय कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत हॉकी इंडियाने वाढवल्याच्या एक दिवसानंतरच या पदावर काम करण्यासाठी हरेंद्र सिंग यांनी उत्सुकता दर्शवली आहे. हरेंद्र सिंग यांनी कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे समजते.

डिसेंबर २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेनंतर हरेंद्र सिंग यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र हॉकी इंडियाने हरेंद्र यांच्यावर पूर्वीच्या संघाची जबाबदारी सोपवण्याची योजना आखली होती, पण ती चाल यशस्वी ठरली नाही. परदेशी प्रशिक्षकांना दिले जाणारे वेतन, भत्ते, फायदे आपल्यालाही मिळावेत, अशी मागणी हरेंद्र यांनी केली आहे. आता आपल्या अटी-शर्तीनुसारच हरेंद्र यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

‘‘बऱ्याच आठवडय़ांपूर्वी मी या पदासाठी अर्ज केला होता. तेव्हाही आणि आताही माझ्या अटी सारख्याच आहेत. परदेशी प्रशिक्षकांना मिळणारे वेतन आणि सुविधा मलाही मिळायला हव्यात. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. परदेशी प्रशिक्षकांना मिळणारे १० हजार ते १२ हजार अमेरिकन डॉलरचे मानधन मलाही मिळण्यात यावे,’’ असे हरेंद्र यांनी सांगितले.

मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी २०२१ मध्ये होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेपर्यंत असेल. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै होती, नंतर ती २५ जुलै आणि आता १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या महिन्यापर्यंत ज्यूड फेलिक्स या पदावर कार्यरत होते, मात्र खराब कामगिरीमुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.