ग्रँडमास्टर आणि कनिष्ठ जागतिक विजेत्या द्रोणावल्ली हरिकाने नवव्या आणि अंतिम फेरीत इस्रायलच्या अलोन मिंडलिनविरुद्ध बरोबरी पत्करत पोकर मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला. इंग्लंडचा ग्रँडमास्टर नायजेल शॉर्टने अंतिम फेरीत डेव्हिड हॉवेलचा पराभव करीत स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
महिला गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी हरिकाला बरोबरी पुरेशी होती. त्यामुळे अंतिम फेरीत कोणतेही धोके न पत्करता हरिकाने सहजपणे हा सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे महिला गटात तिने ५.५ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले. महिलांमध्ये जर्मनीच्या एलिझाबेथ पहेट्झ हिने दुसरे, तर रोमानियाच्या इलिना एल’अमी हिने तिसरे स्थान मिळवले. हॉवेलचा राजा संकटात असताना नायजेल शॉर्टने अप्रतिम खेळ करीत जेतेपद प्राप्त केले. शॉर्टने ७.५ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. नेदरलँड्सचा सर्जी टिव्हिआकोव्ह, फ्रान्सचा लॉरेन्ट फ्रेसिनेट, इस्रायलचा गिल पोपिलस्की आणि हॉवेल यांना संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचा ग्रँडमास्टर अभिजित गुप्ताला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. नेदरलँड्सच्या जॉर्डेन व्हॅन फॉरिस्टविरुद्ध बरोबरी पत्करत अभिजितने ५.५ गुणांसह १२ वे स्थान पटकावले.