भारताला महिलांच्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत पदक मिळविण्यात अपयश आले, मात्र या संघातील द्रोणावली हरिका व कोनेरू हम्पी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली.
हरिका व हम्पी यांनी मिळविलेल्या पदकांचा अपवाद वगळता भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांनी अक्षम्य चुका टाळल्या असत्या तर कदाचित त्यांना सांघिक विभागात रौप्य किंवा कांस्यपदक मिळाले असते. भारताला विशेष प्रवेशिकेद्वारे या स्पर्धेत स्थान मिळाले होते ही गोष्ट लक्षात घेता चौथे स्थान ही समाधानकारक कामगिरी म्हणावी लागेल. कांस्यपदक मिळविणाऱ्या चीनपेक्षा केवळ एक गुण त्यांना कमी मिळाला. चीनने दहा गुणांची कमाई केली.   जॉर्जियाने   १७ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. रशियाने शेवटच्या फेरीत अमेरिकेवर मात करीत रौप्य मिळविले.
शेवटच्या फेरीत भारताने अर्मेनियावर ३-१ अशी मात केली. पहिल्या डावात हम्पीला लिलित मॅक्रचिनाकडून पराभव स्वीकारावा लागला. हरिकाने दुसऱ्या डावात लिलित गलोजनला पराभूत करीत १-१ अशी बरोबरी केली. पाठोपाठ पद्मिनी राऊतने मारिया कुसरेवाच्यावर मात केली व भारतास २-१ असे आधिक्य मिळवून दिले. सौम्या स्वामिनाथनने सुसाना गाबोयानला हरवले.