भारताच्या पी. हरिकृष्णने पोलंडचा ग्रँडमास्टर बाटरेझ सोकोवर मात करीत कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली. मात्र त्याचा सहकारी अभिजित गुप्ताला फ्रेंच ग्रँडमास्टर मॅथियू कॉनरेट याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
तिसऱ्या फेरीत युक्रेनच्या मिखाईल ओलेक्सिंको याच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर हरिकृष्ण याने चौथ्या फेरीत सुरेख खेळाचा प्रत्यय घडविला. त्याने किंग्ज इंडियन डिफेन्स तंत्राचा उपयोग करीत ४५व्या चालीला विजय मिळविला. कॉनरेट याच्याविरुद्ध डावाच्या मध्यास गुप्ता याची बाजू थोडीशी कमकुवत झाली होती, मात्र गुप्ता याने कल्पकतेने चाली करीत आपला बचाव भक्कम केला. त्यामुळे कॉनरेटने ५३व्या चालीला बरोबरी मान्य केली. हरिकृष्ण व गुप्ता यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.
महाराष्ट्राच्या शार्दूल गागरे याने नवव्या मानांकित अर्कादिज नैदीतिश या जर्मन खेळाडूवर मात करीत सर्वाना चकित केले. त्याचे आता दोन गुण झाले असून, ग्रँडमास्टर किताब मिळविण्याच्या दिशेने त्याने वाटचाल केली आहे.
स्पर्धेतील चौथ्या फेरीअखेर अनीष गिरीने चार गुणांसह आघाडी स्थान राखले आहे. पाच खेळाडूंनी प्रत्येकी साडेतीन गुणांसह त्याच्या खालोखाल स्थान घेतले आहे.