भारताच्या ट्वेन्टी-२० महिला संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरला करोनाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या हरमनप्रीतने करोनाची लक्षणे आढळल्याने सोमवारी चाचणी केली. त्यानुसार मंगळवारी आलेल्या अहवालात तिला करोना झाल्याचे निष्पन्न झाले.

हरमनप्रीत सध्या घरातच विलगीकरण करत असून तिची प्रकृती ठीक आहे. आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेदरम्यानच खोकला आणि सर्दी झाल्याने तिने घरी परतण्याचा निर्णय घेतला, असे हरमनप्रीतच्या कुटुंबीयांनी सांगितले.

शफालीचे अग्रस्थान कायम

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या लढतीत ३० चेंडूंत ६० धावांची खेळी साकारणाऱ्या शफाली वर्माने मंगळवारी महिलांच्या ताज्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे. शफालीने (७७६ गुण) गेल्या आठवड्यातील आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीसह २६ गुण कमावले.