भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला आहे. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारी हरमनप्रीत पहिली खेळाडू ठरली आहे. शुक्रवारी सुरतमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध पार पडलेला सामना हा हरमनप्रीतचा शंभरावा सामना होता. भारताकडून महेंद्रसिंह धोनीने आणि रोहित शर्माने ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.

आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये १० खेळाडूंनी १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १११ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. भारताकडून मिताली राजने ८९ तर झुलन गोस्वामीने ६८ आणि वेदा कृष्णमुर्तीने ६३ सामने खेळले आहेत.