महिला विश्वचषकाची फायनल मॅच रविवारी इंग्लंडसोबत रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच महिला टीमची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. रविवारी होणाऱ्या सामन्याचा सराव करतानाच हरमनप्रीतला ही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमीफायनलमध्ये १७१ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या हरमनप्रीतच्या रविवारच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशातच तिच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येते आहे.

टीम सपोर्ट स्टाफकडून हरमनप्रीत फिट कशी राहिल याची प्रत्येक काळजी घेतली जाते आहे. मात्र ती इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात ती खेळणार की नाही याचा निर्णय रविवारच्या सामन्याआधी घेण्यात येईल असं समजतं आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या खेळाकडे लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर काहीसं विरजण पडलं आहे, तसंच रविवारी हरमनप्रीत खेळू शकणार की नाही याचीही धाकधूक निर्माण झाली आहे.

हरमनप्रीतनं ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ११५ चेंडूत तिनं नाबाद १७१ धावांचा डोंगर रचत कांगारूंची अक्षरशः पिसं काढली. या मॅचमध्ये हरमनप्रीतनं २० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. रविवारी होणाऱ्या महिला विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडची टीम विजयाची दावेदार मानली जाते आहे.

सट्टाबाजारानंही पहिली पसंती इंग्लंडलाच दिली आहे. अशात हरमनप्रीत जर खेळली तर हे चित्र बदलू शकतं म्हणूनच रविवारच्या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे, अशातच हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाल्यानं सगळ्यांच्याच मनात धाकधूक निर्माण झाली आहे. २००५ नंतर पहिल्यांदाच महिलांची टीम विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचली आहे. अशात आता हरमनप्रीत खेळू शकणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे क्रिकेट रसिक आणि हरमनप्रीतसाठी प्रार्थनाच करत आहेत.