ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

विस्फोटक फलंदाज ते भारतीय संघाची कर्णधार असा सुवर्णप्रवास करणाऱ्या महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरच्या कारकीर्दीचा आढावा.

हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध ‘सुपरहिरो’पकी एक म्हणजे ‘वंडर वुमन.’ कठीण परिस्थितीत मोक्याच्या क्षणी धावून येत सर्वाना तारण्यात पटाईत असलेल्या वंडर वुमनने अनेक पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या पुरुषांच्या मक्तेदारीला कडवी झुंज दिली. मात्र भारतीय क्रिकेटला गेली अनेक वष्रे अशा एका वंडर वुमनची प्रतीक्षा होती. सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पध्रेच्या निमित्ताने भारताला हरमनप्रीत कौरच्या रूपात वंडर वुमन मिळाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला आदर्श मानणाऱ्या हरमनप्रीतची फलंदाजीची शैलीही सेहवागसारखीच आहे, याची प्रचीती सर्वानाच मागील वर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत हरमनप्रीतने ‘न भूतो, न भविष्यति’ अशी खेळी साकारली. तिच्या धडाकेबाज नाबाद १७१ धावांमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारून दिमाखात अंतिम फेरी गाठली, मात्र भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अगदी थोडक्यात हुकले. महिला क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी हरमनप्रीतने साकारलेली ती खेळी किती महत्त्वाची होती, याचे शब्दांत वर्णन करणे कठीणच.

९ नोव्हेंबरपासून िवडीजमध्ये सुरू झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात हरमनप्रीतने अवघ्या ४९ चेंडूंत शतक ठोकून अनेक विक्रम आपल्या नावावर केले. महिला क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-ट्वेन्टी प्रकारात भारतातर्फे शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरलीच, शिवाय विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मानही तिने मिळवला. विशेष म्हणजे कर्णधारपदाचा काटेरी मुकुट डोक्यावर घेत तिने अफलातून फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची भंबेरी उडवली. तिच्या या खेळीमुळे अनेक आजी-माजी पुरुष क्रिकेटपटूंनीसुद्धा समाजमाध्यमांवर तिच्यावर कौतुकाचा वर्षांव केला. मात्र स्वत: हरमनप्रीतने तिला धाव काढण्याचा कधी कधी कंटाळा येत असल्याने फटकेबाजी करण्यावर भर दिला, असे सांगून सर्वानाच गप्प केले. अशा या बिनधास्त हरमनप्रीतच्या कारकीर्दीचा सुरुवातीचा मार्ग मात्र काटय़ांनी भरला होता.

पाय पाळण्यात दिसतात…

पंजाबमधील मोगा येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणजेच ८ मार्च, १९८९ रोजी जन्मलेल्या हरमनप्रीतच्या कुटुंबात खेळाचेच वातावरण होते. वडील हरमंदर स्वत: बास्केटबॉलपटू असल्याने हरमनप्रीतला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. मात्र मुलीने खेळात कारकीर्द घडवावी, अशी उदाहरणे त्या काळात  कमीच. वडिलांच्या पािठब्यामुळे हरमनप्रीतने वयाच्या १२व्या वर्षी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या परिसरात मुलींची संख्या कमी असल्याने ती सुरुवातीच्या काळात मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. अनेक वेळा तिला मुलगी म्हणून फलंदाजी-गोलंदाजी न देता फक्त क्षेत्ररक्षणासाठी संघात खेळवले जायचे. मात्र फलंदाजीची संधी मिळताच हरमनप्रीत तिच्या वयापेक्षा मोठय़ा गोलंदाजांनाही हैराण करायची. उत्तुंग षटकार खेचत तिने गल्ली क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही आपल्या नावावर केले असतील. कदाचित चेंडूला स्टेडियमपार भिरकावण्याची कला तिला तेव्हापासून अवगत झाली असावी.

मुख्य म्हणजे हरमनप्रीतचा भाऊ गुरजिंदर सिंग आणि त्याचे मित्र हरमनप्रीतला मुद्दामहून चिडवायचेदेखील. पुरुषांना क्रिकेटमध्ये भरपूर पर्याय आहेत. तू क्रिकेट खेळून काय सेहवागसोबत सलामीला जाणार आहेस का, अशा प्रकारे तिची अनेक जण खिल्ली उडवायचे. मात्र आक्रमकता नसानसांत भिनलेल्या हरमनप्रीतने हार न मानता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही हरमनप्रीतने चमक दाखवली. मात्र त्यावेळी महिला क्रिकेटला तितकी प्रसिद्धीच नसल्याने तिच्यासह अनेकांची कामगिरी झाकोळली गेली. मार्च २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीतला राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्या सामन्यात तिने गोलंदाजीत कमाल करत चार षटकांत अवघ्या १० धावा देत एक बळी मिळवला. त्याच वर्षी जूनमध्ये तिने इंग्लंडविरुद्धच्या लढतीने ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

२०१२ मध्ये अनुभवी खेळाडू मिताली राज व झुलन गोस्वामी यांच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतकडे पहिल्यांदाच भारतीय महिला ट्वेन्टी-ट्वेन्टी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने हरमनप्रीतच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ८१ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपदास गवसणी घातली. बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने ९९ चेंडूंत १०३ धावांसह कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. २०१४ मध्ये हरमनप्रीतने मुंबईत स्थलांतर करत भारतीय रेल्वेसाठी काम करण्यास सुरू केले.

हरमनप्रीतच्या कारकीर्दीने खऱ्या अर्थाने वेग धरला तो २०१६ या वर्षांत. भारतीय संघात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध महिलांच्या बिग बॅश क्रिकेट लीगसाठी पाचारण करण्यात आले. या स्पध्रेत खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवणाऱ्या हरमनप्रीतने सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व करत तब्बल चार सामन्यांत सामनावीर पुरस्कारही मिळवला. उजव्या हाताने फलंदाजी करणारी हरमनप्रीत तितक्याच किफायतशीरपणे गोलंदाजीसुद्धा करू शकते. त्यामुळेच कोणत्याही संघाकडून खेळताना तिचे अंतिम ११ खेळाडूंमधील स्थान पक्के असते. क्षेत्ररक्षणातही हरमनप्रीत बहुमूल्य योगदान देण्यात पटाईत असून संघातील सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडूंपकी एक म्हणून तिची गणना केली जाते.

२०१६ मध्येच हरमनप्रीतला भारताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी संघाचे कायमस्वरूपी नेतृत्व सोपवण्यात आले. तिच्या कर्णधारपदाखाली भारताने आशिया चषक पटकावण्याची किमया तर साधलीच शिवाय हरमनप्रीतने स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही मिळवला.  तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला सर्वाधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळवून देण्यात (३१ चेंडूंत ४६ धावा ) तिने मोलाचा वाटा उचलला. २०१७ च्या विश्वचषकामुळे हरमनप्रीत देशाच्या घराघरांत पोहोचली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिची ती धडाकेबाज खेळी पाहून अनेक तरूण मुलींनी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला.

झुलन गोस्वामीने ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटमधून पत्करलेली निवृत्ती आणि मिताली राजचीही त्याच दिशेने सुरू असलेली वाटचाल, अशा परिस्थितीत हरमनप्रीतच्या खांद्यावर संघ व्यवस्थापनाने भारतीय संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे तिच्याकडून सर्वानाच अपेक्षा आहेत. त्यामुळे यंदा तरी भारतीय महिला संघास पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्यासाठी २९ वर्षीय हरमनप्रीत व तिचे युवा शिलेदार संपूर्ण जोर लावतील, अशी सर्व भारतीय क्रीडारसिकांना आशा आहे.

हरमनप्रीतची कारकीर्द

  • बिग बॅश लीगप्रमाणेच इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये सरे स्टार्स संघाकडून खेळणारी हरमनप्रीत पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
  • वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०१२ मध्ये भारतीय महिला ट्वेन्टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद भूषवणारी हरमनप्रीत सर्वात युवा कर्णधार आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्यांच्या यादीत हरमनप्रीत (१७१ धावा) दुसऱ्या स्थानी आहे. डावखुरी फलंदाज दीप्ती शर्मा (१८८) ही पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत भारतातर्फे अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी हरमनप्रीत (जुल २०१७) मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी दुसरी खेळाडू आहे.
  • २०१४ मध्ये मुंबईत येण्यापूर्वी २०१२ साली हरमनप्रीतने पंजाबमध्ये पोलिस खात्यातील नोकरीसाठी अर्ज भरला होता. मात्र सुदैवाने तेथे तिची निवड झाली नाही व २०१४ मध्ये बीसीसीआयच्या महिला क्रिकेट संदर्भातील कायद्यानुसार तिला रेल्वेकडून काम करण्याची संधी मिळाली.

    सौजन्य – लोकप्रभा