नुकत्याच टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धेत भारताला कर्णधार या नात्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून दिल्याचा अभिमान ‘ड्रॅग-फ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याला वाटत आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने या स्पर्धेसाठी काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत युवा संघ निवडला होता. तरीही भारताने न्यूझीलंडला ५-० असे हरवत विजेतेपदावर नाव कोरले. भारताच्या कामगिरीविषयी हरमनप्रीत म्हणाला, ‘‘संघातील प्रत्येकालाच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. संघातील युवा खेळाडूंनी चांगला खेळ करत भारताच्या विजयात योगदान दिले. जपान, मलेशिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्ध आम्ही शानदार खेळ केला. कर्णधार या नात्याने पहिल्याच प्रयत्नात भारताला चांगले यश मिळवून देता आल्याचा अभिमान वाटत आहे.’’

ड्रॅग-फ्लिकर या नात्याने हरमनप्रीतला या स्पर्धेत दोन गोल करता आले. याविषयी त्याने सांगितले की, ‘‘लहान असल्यापासूनच मी गोल कसे करता येतील, यावर मेहनत घेत आहे. महत्त्वाच्या क्षणी गोल करून संघाच्या विजयात योगदान दिल्याचा आनंद होत आहे. माझ्या ड्रॅगफ्लिकच्या क्षमतेवर मी प्रशिक्षकांसह मेहनत घेत आहे.’’