*   इंग्लंडची भारतावर मात
*   इंग्लिश शतकवीर चार्लेट एडवर्ड्स सामनावीर
*   हरमनप्रीतचे झुंजार शतक व्यर्थ
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जवळपास तीन हजार प्रेक्षकांनी ब्रेबॉर्न स्टेडियम दणाणून सोडले, भारताला ढोल-ताशांच्या गजरात जबरदस्त पाठिंबा मिळत होता. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौर इंग्लंडच्या गोलंदाजीवर चांगलीच बरसलीही, पण अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न लाभल्याने भारतावर विजयाची प्रीत मात्र रुसली. कर्णधार चार्लेट एडवर्ड्सच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान ठेवले आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ३२ धावांनी विजय साकारला.
नाणेफेक जिंकून भारताने इंग्लंडला फलंदाजीला पाचारण करून त्यांची १ बाद ४ अशी अवस्था केली, पण त्यानंतर एडवर्ड्सने १६ चौकारांच्या जोरावर १०९ धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. एडवर्ड्सने यावेळी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला, त्याचबरोबर विश्वचषकात हजार धावा पूर्ण करणारी ती चौथी फलंदाज ठरली.
इंग्लंडच्या २७३ धावांचा पाठलाग करताना भारताची ३ बाद २९ अशी अवस्था होती. त्यानंतर कौर आणि करुणा जैन (५६) यांनी चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. कौरने यावेळी ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद १०७ धावांची खेळी साकारली खरी, पण जैन बाद झाल्यावर मात्र तिला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ न मिळाल्याने भारताला सामना गमवावा लागला आणि तिची शतकी खेळी व्यर्थ ठरली. कॅथेरीन ब्रंटने भारताच्या चार महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या बाजूने सामना झुकवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत ८ बाद २७२ (चार्लेट एडवर्ड्स १०९; झुलान गोस्वामी २/५०) विजयी वि. भारत : ५० षटकांत ९ बाद २४० (हरमनप्रीत कौर नाबाद १०७; करुणा जैन ५६; कॅथेरीन ब्रंट ४/२९) सामनावीर : चार्लेट एडवर्ड्स.
वेस्ट इंडिजचा ‘टेलर’मेड विजय
मुंबई : स्टेफनी टेलरच्या घणाघाती १७१ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर तब्बल २०९ धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवले. टेलरने १३७ चेंडूंत १८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर तब्बल १७१ धावांची तुफानी खेळी साकारली, तर डिएन्ड्रा डॉटिनने विश्वचषकातले सर्वात जलद अर्धशतक झळकावत त्यावर कळस चढवला. डॉटिनने २२ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावा फटकावल्या. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला ५० षटकांत ८ बळींच्या मोबदल्यात ३६८ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १५९ धावांतच आटोपला.
पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून धुव्वा
कटक : विश्वचषकापूर्वी चर्चेत राहिलेल्या पाकिस्तानच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा न्यूझीलंडने अवघ्या १०४ धावांत खुर्दा उडवला. पाकिस्तानच्या फक्त तीन फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्या करता आली. रचेल कॅन्डीने अवघ्या १९ धावांत ५ बळी मिळवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. विजयासाठीचे १०५ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ७ विकेट्स आणि १२२ चेंडू राखून सहज पार केले. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने ८४ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर नाबाद ६५ धावांची खेळी साकारत संघाला सहज विजय मिळवून दिला. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाच सरस
कटक : रचेल हेन्सच्या ८३ धावा आणि इलिस पेरीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रंगतदार लढतीत दक्षिण आफ्रिकेला तीन विकेट्सने पराभूत करत आपणच सरस असल्याचे दाखवून दिले. पेरीने ३५ धावांत तीन विकेट्स काढत दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. त्रिशा चेट्टी (५९) आणि मॅरेझिन कॅप (६१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ठराविक फरकाने फलंदाज बाद होत असताना हेन्सने १० चौकारांच्या जोरावर ८३ धावा काढत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ७ बाद १५५ अशी अवस्था असताना एरिन ऑसबोर्न (नाबाद २४) आणि पेरी (नाबाद १४) यांनी अखेपर्यंत किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.