सातत्याने जैव-सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करताना खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून भारताचे बहुतांश खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणाचा भाग आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांना घरी परतण्याची संधी मिळाली, परंतु फेब्रुवारीपासून इंग्लंड दौऱ्याला प्रारंभ झाल्यानंतर त्यांना पुन्हा या वातावरणात दाखल व्हावे लागले. त्यामुळे आगामी ‘आयपीएल’पूर्वी कोहलीने संघमालकांना इशारा दिला आहे.

‘‘गेल्या काही महिन्यांपासून जैव-सुरक्षित वातावरण हे खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहे. त्यामुळे या वातावरणात राहणे किती आव्हानात्मक असते, हे फक्त खेळाडू तसेच संघ व्यवस्थापनातील सदस्यांना ठाऊक आहे. परंतु आता ‘आयपीएल’दरम्यान भारत-इंग्लंड संघांतील खेळाडूंना शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या थकवा जाणवू शकतो. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे सामन्यांची निवड करण्याची मुभा द्यावी. यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक आखतानाही खेळाडूंच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा,’’ असे कोहली म्हणाला.

याव्यतिरिक्त इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात चार बळी मिळवण्याबरोबरच २१ चेंडूंत ३० धावा फटकावणाऱ्या शार्दूल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याबद्दल कोहलीने आश्चर्य व्यक्त केले.

सॅम करनमध्ये धोनीचे गुण -बटलर

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी साकारून इंग्लंडला जवळपास विजय मिळवून देणाऱ्या सॅम करनमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे गुण दिसल्याची कबुली इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने दिली. ‘‘करनने साकारलेली खेळी वाखाणण्याजोगी होती. त्याने महेंद्रसिंह धोनीप्रमाणे अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. ‘आयपीएल’मध्ये धोनीसह खेळल्यामुळे त्याच्यात हा बदल झाला आहे,’’ असे बटलर म्हणाला.

पंतशिवाय भारतीय संघाची कल्पना करणे कठीण -बेल

लंडन : डावखुरा फलंदाज ऋषभ पंत हा फार मौल्यवान खेळाडू असून भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघात त्याचा समावेश असणे गरजेचे आहे, असे मत इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेलने व्यक्त केले. ‘‘जवळपास वर्षभरापूर्वी ऋषभ पंतला भारतीय चाहत्यांकडूनच टीकेला सामोरे जावे लागायचे. परंतु सध्या तो संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनंतर पंतसारख्या खेळाडूशिवाय भारतीय संघाची कल्पना करणे जवळपास कठीण आहे. असे खेळाडू क्वचितच घडतात, त्यामुळे भारताने त्याच्या कौशल्याचा पूरेपूर वापर केला पाहिजे,’’ असे बेल म्हणाला.