17 October 2019

News Flash

शालेय क्रिकेटमध्ये सिंग बंधूंची उत्तुंग भरारी!

अल बरकत मलिक मोहम्मद इस्लाम इंग्रजी शाळेने सलग दुसऱ्यांदा हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

|| ऋषिकेश बामणे

अल बरकत मलिक मोहम्मद इस्लाम इंग्रजी शाळेने सलग दुसऱ्यांदा हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजेतेपदात हिमांशू आणि दिव्यांशू सिंग या दोन जुळ्या बंधूंचा सिहाचा वाटा आहे. अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या या जुळ्या भावांचा खेळ पाहताना अनेकांना क्रिकेटमधील स्टीव्ह वॉ-मार्क वॉ, इरफान-युसूफ पठाण, शॉन-मिचेल मार्श अशा भावांच्या जोडय़ांची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

अकोला येथे २४ जुलै २००३ मध्ये जन्मलेल्या दिव्यांशू आणि हिमांशू यांच्यात अवघे पाच मिनिटांचे अंतर. दोघांनीही क्रिकेटमध्ये नशीब अजमावण्याचे ठरवले. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा दिव्यांशू हा या दोघांपैकी मोठा. यंदाच्या हंगामात दिव्यांशूला तितकी उल्लेखनीय कामगिरी करता आली नसली तरी गेल्या वर्षी दिव्यांशूने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. रिझवी स्प्रिंगफिल्डविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने धाकटा भाऊ हिमांशूसह दहाव्या गडय़ासाठी १७० धावांची भागीदारी रचून सर्वाची वाहवा मिळवली होती. हिमांशूने १६१ तर दिव्यांशूने १७ धावांचे योगदान देत करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.

सर्वाधिक चंचल, परंतु अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रभावी कामगिरी करणारा हिमांशू हा भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आदर्श मानतो. हिमांशूने यंदाच्या हंगामात आपल्या फिरकीच्या बळावर तीन सामन्यांत १२० धावा आणि एकूण १५ बळी मिळवत स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही हिमांशूनेच या पुरस्काराला गवसणी घातली होती. ‘‘सुरुवातीला मी फलंदाजीवर अधिक लक्ष द्यायचो. मात्र अश्विनला पाहून मी त्याच्यासारखी गोलंदाजी करायला लागलो. गरज पडल्यास मी उपयुक्त फलंदाजीही करू शकतो,’’ असे हिमांशू म्हणाला.

या दोघांनी यंदाच्या विजय र्मचट स्पर्धेत मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले असून २०१६मध्ये गाईल्स शिल्ड स्पर्धेत हिमांशूच्या गोलंदाजी शैलीवर एका पंचाने आक्षेप घेतला होता. त्यातून सावरण्यासाठी हिमांशूला जवळपास ८ ते १० महिन्यांचा काळ लागला. हिमांशूने हार न मानता पुन्हा एकदा गोलंदाजीवर मेहनत घेतली आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) वैध प्रमाणपत्र मिळवून त्याने अल बरकत संघात पुनरागमन केले. त्यामुळे आजही त्याच्या गोलंदाजीत अश्विनची छबी दिसतेच.

आई-वडिलांच्या सहकार्यामुळे व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आपण उत्तम कामगिरी करत असून पुढील काही वर्षांत भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवण्याचे ध्येय या दोघांनी बाळगले आहे. ६ वर्षांपूर्वी अकोल्याहून सांताक्रूझ येथे स्थायिक झालेल्या या बंधूंची गाडी आता रुळावर आली असून येणाऱ्या वर्षांत ती किती वेग पकडते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

First Published on January 12, 2019 12:09 am

Web Title: harris shield cricket tournament 2