‘लोकसत्ता गप्पा’मध्ये यंदा हर्ष भोगले

मुंबई : मुख्य प्रवाहातील क्रिकेटची फारशी पाश्र्वभूमी नसतानाही गेली अनेक वर्षे जगभर आघाडीचे समालोचक आणि संवादक म्हणून नावलौकिक मिळवलेले हर्ष भोगले हे यंदाच्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहेत. क्रिकेटच्या खेळाला आणि क्रिकेटपटूंना समालोचनाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवणाऱ्या या प्रसन्नचित्त, विनयशील आणि समयचतुर समालोचकाची लोकप्रियता आजच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंप्रमाणेच असीम आणि कालातीत आहे.

सचिन तेंडुलकरचा उदय, भारतीय क्रिकेटला पुन्हा मिळालेले वैभव, टी-२० क्रिकेटचा भलाबुरा प्रभाव अशा महत्त्वपूूर्ण स्थित्यंतरांचे जवळचे साक्षीदार आणि अभ्यासक ही त्यांची ओळख. केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) येथून पदव्युत्तर शिक्षण अशी निश्चिंत पाश्र्वभूमी असूनही केवळ क्रिकेटच्या आवडीपोटी हर्ष भोगले यांनी वेगळी वाट धरली. भाषेवरील प्रभुत्व, शब्दांवरील पकड, हजरजबाबीपणा आणि परिस्थितीचे अचूक निरीक्षण रसाळ भाषेत मांडण्याची क्षमता या शिदोरीवर त्यांनी त्या वेळी काहीशा दोलायमान अशा क्रिकेट समालोचन क्षेत्रात प्रवेश केला. आजतागायत ४००हून अधिक एकदिवसीय सामने, १००हून अधिक कसोटी, असंख्य टी-२० सामन्यांचे त्यांनी समालोचन केले आहे. क्रिकेटचा सामना आणि हर्ष भोगले यांचे समालोचन हे जणू समीकरणच बनून गेले. वस्तुनिष्ठ विश्लेषणाबरोबरच विविध देशांतील, विविध स्वभावाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंना चटकन आपलेसे करून घेण्याच्या त्यांच्या खुबीमुळे हर्ष भोगले यांची लोकप्रियता परदेशातही मोठय़ा प्रमाणावर आहे. समालोचनाबरोबरच ‘इंडियन एक्स्प्रेस’सह अनेक आघाडीची वृत्तपत्रे, नियतकालिके, संकेतस्थळ यांच्यासाठी त्यांनी विपुल लिखाणही केले आहे. ते ‘मोटिव्हेशनल वक्ते’ म्हणूनही ओळखले जातात.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, अभिजात संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-शायर जावेद अख्तर, अभिनेते नसिरुद्दीन शहा, मनस्वी कवी गुलजार, रंगरेषाकार सुभाष अवचट, गानविदुषी प्रभा अत्रे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, ख्याल संगीतात गेल्या तीन दशकांत अनेक प्रयोग करणारे उस्ताद राशिद खान आदी मान्यवरांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे.

‘एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गप्पा’ हा कार्यक्रम येत्या ११ ऑक्टोबर रोजी (शुक्रवार) पुण्यात होत असून, ‘तन्वी हर्बल्स’ हे कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.