हर्षवर्धन हा मूळचा अकोले तालुक्यातील असला तरी नाशिकमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षण घेतल्याने त्याने नाशिकलाच आपले घर मानले. कुस्तीच्या वेडामुळे लहानपणापासून घेतलेल्या कष्टाचे फळ ‘महाराष्ट्र केसरी’ च्या विजेतेपदाच्या रूपाने मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीरचे स्थानिक प्रशिक्षक तथा जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांनी व्यक्त केली.

हर्षवर्धन ११ वर्षांचा असतानाच भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी दाखल झाला. बलकवडे तसेच त्यांचा मुलगा विशाल यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. अनेक शालेय स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवून हर्षवर्धनने आपले कौशल्य दाखवून दिले होते. अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यावर त्याचे नाव अधिक चर्चेत आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतवेळचे विजेते आणि उपविजेत्यांपैकीच कोणीतरी बाजी मारेल, असेच म्हटले जात होते. परंतु, हर्षवर्धन चमत्कार करू शकतो, असे मनोमनी वाटत होते, असे बलकवडे यांनी नमूद केले. स्वभावाला अतिशय मनमिळाऊ, कधीही कोणत्याही वादात न सापडण्याची वृत्ती आणि केवळ कुस्तीवर लक्ष, ही हर्षवर्धनच्या स्वभावाची वैशिष्टय़े सांगता येतील. ९० किलो वजन असलेल्या कुस्तीपटूंना भगूरच्या व्यायामशाळेत ठेवता येत नसल्याने आणि अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे दोन वर्षांपासून हर्षवर्धनने काका पवार यांची तालीम गाठल्याचेही बलकवडे यांनी नमूद केले.