पाटणा, बिहार येथे सुरु असलेल्या ३९व्या कनिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईकर हर्षील दाणीने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात जेतेपदावर नाव कोरले. माजी खेळाडू उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हर्षीलने अंतिम लढतीत आदित्य जोशीवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवला.
१९ वर्षांखालील मुलींमध्ये रितुपर्णा दासने अकादमीतील सहकारी रुथविका शिवानीवर २१-१९, २१-१९ अशी मात करत जेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा आणि पूजा.डी जोडीने जेतेपदावर नाव कोरले. १७ वर्षांखालील मुलांमध्ये सिरिल वर्माने द्वितीय मानांकित चिराग सेनचा २१-१४, १५-२१, २३-२१ असा पराभव केला. मुलींध्ये श्रियंशी परदेशीने वृषाली.जीला २१-१६, २१-१५ असे नमवले. मुलींच्या दुहेरीत अश्विनी भट-मिथुला यु.के अजिंक्य ठरले. मुलांच्या दुहेरीत कृष्णा प्रसाद आणि सात्विक साईराज जोडीने जेतेपद मिळवले.