मुंबई : हरयाणा स्टीलर्सचा धरमराज चेरलाथन कोणत्याही दौऱ्यावर निघाला की खांद्यावर आणखी एक खास बॅग त्याच्यासोबत असते. वयाच्या ४४व्या वर्षीही मैदानावर उत्तम डावा कोपरारक्षण आणि यशस्वीपणे नेतृत्व करणाऱ्या धरमराजच्या तंदुरुस्तीची भिस्त या बॅगेत असते.

राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा प्रो कबड्डी धरमराज आपल्यासोबत मिक्सर आणि सुकामेवा घेऊनच फिरतो. या धोरणाबाबत तो म्हणाला, ‘‘तेलकट पदार्थ मी टाळतो. दोन वेळचे जेवण, फळांचा रस आणि सुकामेवा हे आरोग्यासाठी हितकारक असतात. त्यांचेच मी पुरेशा प्रमाणात सेवन करतो.’’

धरमराजविषयी रेल्वेचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी सांगतात की, ‘‘सकाळी वेळेत उठणे आणि रात्री वेळेत झोपणे ही धरमराजची खासियत. सरावालासुद्धा तो वेळेतच हजर असतो. मोबाइलवर फार वेळ घालवत नाही. आपल्या खेळाकडेच त्याचे विशेष लक्ष असते. संघातील चढाईपटूंना योग्य सूचना देतो, तसेच अन्य खेळाडूंच्या सूचनासुद्धा ऐकतो.’’

प्रो कबड्डीमधील प्रवासाविषयी धरमराज म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीत अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळायला मिळते. नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करणे, परिस्थितीनुसार सूचना देणे, हे नित्यनेमाने करीत असतो. युवा खेळाडूंसाठी प्रो कबड्डीचे उत्तम व्यासपीठ निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. हेच त्यांना समजवत असतो.’’

प्रो कबड्डीमुळे हा खेळ चढाईपटूंप्रमाणेच पकडपटूंचाही झाला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना धरमराज म्हणाला, ‘‘कबड्डी हा सांघिक खेळ आहे. एक चढाईपटू किंवा एक पकडपटू सामना जिंकून देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये जसे फलंदाज लक्ष वेधतो, पण गोलंदाजाकडे दुर्लक्ष होते. तसेच कबड्डीमध्ये आहे. या खेळातही बचावफळीपेक्षा चढाईपटूची कामगिरी लक्षणीय ठरते.’’

काही महिन्यांपूर्वी रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत धरमराजच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेने विजेतेपद पटकावले. प्रो कबड्डीत मात्र यू मुंबाविरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे हरयाणाचे आव्हान संपुष्टात आले. परंतु तरीही निराश न होता, तो म्हणाला की, ‘‘आमचा संघ राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम खेळला. साखळी सामन्यांमधील उत्तम कामगिरीच्या बळावर बाद फेरी गाठता आली; परंतु यू मुंबाविरुद्ध आम्ही अपयशी ठरलो.’’