इंग्लंडचा १९ वर्षीय कसोटीपटू हसीब हमीद आणि मुंबईचे एक खास नाते आहे. पदार्पणातच तीन कसोट्यांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करून हसीबने सर्वांची मने जिंकली. एका खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील दोन सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी लागली. हसीब हमीदला भारताविरुद्ध मुंबईत खेळण्याची इच्छा होती परंतु बोटाला झालेल्या जखमेमुळे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

पुढील वेळी भारतामध्ये आल्यावर मुंबईत खेळायला आवडेल असे त्याने पत्रकारांना बोलून दाखवले.
१९ वर्षीय हसीबचे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पण झाले. राजकोट येथे झालेल्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या डावात त्याने ८२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. दुसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक मारुन आपल्या सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.

एकूण तीन कसोटींमध्ये त्याने २१९ धावा काढून आपल्या क्षमतेची चुणूक सर्वांना दाखवली. मोहाली सामन्याच्या वेळी तर त्याच्या हाताला दुखापत झालेली होती तरी देखील त्याने जिद्दीने आपली खेळी पूर्ण केली. पुढे हाताचे दुखणे असह्य झाल्यावर डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

मुंबईच्या सामन्यासाठी त्याने विश्रांती घेतली आणि त्याची जागा कीटन जेनिंग्सने घेतली. पदार्पणातच त्याने शतक ठोकले. हसीबने मोठ्या मनाने त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. जेनिंग्जशी खेळी लाजवाब होती. त्याच्यासोबत मी ही जर खेळपट्टीवर असतो तर मला अधिक आनंद झाला असता असे त्याने म्हटले.

हसीबचे आणि मुंबईचे खास नाते आहे. पाच वर्षांपूर्वी तो मुंबईत आला होता. मुंबईचे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांच्याकडे त्याने कोचिंग घेतले. तो मुंबईत तब्बल ११ महिने होता. त्याने मुंबईत असताना बॅटिंगचे धडे गिरवले त्यामुळेच त्याच्या मनात मुंबईचे स्थान खास आहे.

मागील वर्षीदेखील तो पराडकर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी आला होता. मागील वेळी जेव्हा तो भारतात आला होता त्यापेक्षा त्याच्यामध्ये खेळाडू म्हणून खूप सुधारणा झाल्याचे पराडकर यांनी म्हटले होते. ज्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतले तसेच आपल्या गुरुच्या सानिध्यात आपल्याला खेळ करता यावा ही हसीबची इच्छा अधुरी राहिली त्यामुळेच पुढील वेळी आल्यावर मुंबईत खेळायला आवडेल असे त्याने म्हटले.