भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी घेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हशीम अमलाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
अमलाच्या कप्तानीखाली खेळताना बांगलादेशविरुद्धची मालिका अनिर्णीत राहिली होती, तर भारताविरुद्धच्या मालिकेत ०-३ अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. घरच्या मैदानावर कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा असताना दरबान कसोटीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला नमवले होते. दुसऱ्या कसोटीतही बेन स्टोक्सच्या वेगवान खेळीपुढे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ ठरले होते. या मालिकांदरम्यान अमलाच्या नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ग्रॅमी स्मिथच्या निवृत्तीनंतर २०१४ मध्ये अमलाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यश मिळवले.

हा निर्णय घेणे कठीण होते, पण माझ्यापेक्षा अन्य कोणी ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकतो. मला फलंदाजीवर अधिक काम करण्याची इच्छा आहे. एबी सुयोग्यरीत्या ही जबाबदारी सांभाळेल असा विश्वास आहे.
 हशीम अमला, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज

दक्षिण आफ्रिका-इंग्लंड कसोटी अनिर्णीत
केपटाऊन : पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणलेली दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णीत झाली. इंग्लंडने पहिल्या डावात बेन स्टोक्सच्या तडाखेबंद द्विशतकी खेळीच्या बळावर ६ बाद ६२९ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार हशीम अमलाच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ७ बाद ६२७ धावसंख्येवर डाव घोषित केला. पाचव्या दिवशी बिनबाद १६ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ६ बाद १५९ धावा झाल्या होत्या.